
>>वैष्णवी कानविंदे-पिंगे
पावसाळ्यात भिजलेला दिवस, सोबत वाफळती कॉफी… अशा वेळी एखादा मस्त आठवणीत साठेल असा सिनेमा पाहायला मिळाला तर तो आनंद काही औरच! आणि गंमत म्हणजे तो योग जुळून आला आहे.
मनसोक्त कोसळणार्या पावसाप्रमाणे धुंद करणारा ‘गर्लफ्रेंड’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. हलका फुलका, अगदी अलगद आपल्याला आपल्यातल्याच एखाद्या वेडेपणाची जाणीव करून देणारा आणि फक्त आपणच वेडे नाही, तर प्रत्येकजणच थोडासा वेडा असतो हे गुपित सांगू पाहणारा हा छान सिनेमा प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहावा.
एक साधा मुलगा, नोकरी करणारा, नाकासमोर चालणारा. त्याच्या आयुष्यात कोणी मुलगीच आली नाही त्यामुळे सगळ्यांना टेंशन आलंय. एकटेपणा त्याला खायला उठलाय. मग अचानक असं काही तरी होतं की, त्याच्या आयुष्यात एका रात्रीत एक मस्त मुलगी येते आणि एका लव्ह स्टोरीची सुरुवात होते. कोण असते ही मुलगी, अचानक कधी येते आणि मग ती आल्यावर काय काय घडतं, त्या प्रेमाचं पुढे काय घडतं, असं सगळं सांगणारा हा सिनेमा गर्लफ्रेंड.
या सिनेमातील अभिनयाची बाजू तर अव्वलच आहे. अमेय वाघ हा कुठेही त्याच्या आधीच्या सिनेमातल्या कुठल्याही प्रसिद्ध व्यक्तिरेखेची आठवण करून देत नाही. उलट त्याला पाहताना एक सर्वस्वी नवा मुलगा दिसतो. खरं तर हे खूप कठीण होतं. पण अमेय याने हे आव्हान अगदी सहज स्वीकारलं आणि त्या नचिकेत प्रधानला शंभर टक्के न्याय दिलाय.
दुसरं कौतुक करायचं तर तेच सई ताम्हणकर या अभिनेत्रीचं. ग्लॅमरस, हिंदुस्थानबाहेर राहणारी, थोडीशी वेडी, काही विशिष्ट सवय असणारी आणि आपल्याच धुंदीत जगणारी अशी ही मुलगी. शेवटपर्यंत तिचा थांग लागत नाही तरीही आपण तिच्या प्रेमात पडतो. खरं म्हणजे तिला पाहताना ही अशी काय करतीये, असे प्रश्न मनात येतात आणि गंमत म्हणजे हेच प्रश्न सिनेमातल्याही आजूबाजूच्या लोकांना पडतात आणि त्यामुळे सिनेमाच्या प्रवाहात आपण कधी एकरूप झालोय हे कळतच नाही.
कविता मेढेकर, यतीन कार्येकर, रसिका सुनील, ईशा केतकर, सागर देशमुख, सुयोग गोऱहे, उदय नेने, तेजस बर्वे या इतर सर्व कलाकारांचा अभिनय चांगला झालाय. भाऊ, मित्र असे सगळेच छान, समर्पक, पण या मुख्य दोघांनी मात्र मस्त काम केलं आहे.
या सिनेमाची स्क्रिप्ट ओघवती आणि साधी सोपी आहे, पण तरीही प्रेक्षकाला शेवटपर्यंत नेमकं काय होणार हा विचार करायला भाग पाडते. संवाद अगदी चटपटीत आणि आपलीच बोली बोलणारे. या सिनेमात जेव्हा प्रेक्षक म्हणून आपल्याला काही प्रश्न पडतात तेव्हा ते समोरच्यालादेखील पडतात आणि इथेच प्रेक्षक सिनेमाशी जोडला जातो.
या सिनेमातली गाणीही या सिनेमाचा आणखी एक विशेष. गाणी सिनेमा संपली तरी मनात रेंगाळतात. याच्या पलीकडे जाऊन ती आपण अगदी मनापासून एन्जॉय करतो.
सिनेमा सुरुवातीलाच किंचित खेचला जातोय की काय असं वाटतं, पण नंतर काही वेळातच पकड घेतो आणि अगदी शेवटपर्यंत आपला वेळ कसा जातो हे कळतच नाही. मुळात या सिनेमात एक साधीशी प्रेमकथा असली तरीही नेहमीच्या धाटणीमध्ये फेरफार करून मांडलेला हा सिनेमा नाही. यात एक भक्कम कथा आहे. एक विचार आहे आणि तो अगदी सुंदररीत्या मांडलादेखील आहे. काही स्वभाव असे का, काही माणसं अशी का वागतात, या सगळ्यांची उत्तरं दिग्दर्शक देत बसलेला नाही. उलट ते तसं न केल्यामुळे सिनेमा जास्त संवेदनशील झालाय.
सिनेमा हलका फुलका असला तरीही नकळत विचार करायला लावतो. आपल्याला आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी, आपल्यातले न्यूनगंड आठवायला लागतात. आपण बाहेर वावरताना, इम्प्रेशन मारण्याच्या नादात स्वतःला लपवून ठेवतो आणि इतरांसाठी खोटय़ा वागण्याचा बुरखा कधी चढवतो ते कळतच नाही. पण हा सिनेमा पाहताना जाणवतं की, या सगळ्याची गरज नसते. कदाचित आपण जसे आहोत तसेच राहिलो तर मोकळा श्वास जास्त मनापासून घेऊ शकतो आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे असं का आहे, अमुकचा स्वभाव असा का आणि तमुक तसा का वागतो या जंजाळात न अडकता आहे तसं जगणं जास्त आनंदाचं असतं हे हा सिनेमा पाहताना जाणवतं आणि निखळ करमणूक करता करता आयुष्याचं हे मोठं गुपित हा सिनेमा नकळतच आपल्याला शिकवून जातो.
चित्रपट ‘गर्लफ्रेंड’
दर्जा ***1/2
निर्माते अनिश जोग, रणजित गुगळे
लेखक, दिग्दर्शक उपेंद्र सिधये
संगीतकार हृषीकेश-सौरभ-जसराज
गीतकार क्षितिज पटवर्धन
गायक जसराज जोशी, शाल्मली खोलगडे, श्रुती आठवले
कोरिओग्राफर राहुल – संजीव
सिनेमेटोग्राफर मिलिंद जोग
कलाकार अमेय वाघ, सई ताम्हणकर, रसिका सुनील, ईशा केसकर, सागर देशमुख, कविता लाड, यतीन कार्येकर, सुयोग गोर्हे, उदय नेने, तेजस बर्वे.
























































