
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीने रियाची बँक खाती गोठवली होती. तिचे मोबाईल फोन, लॅपटॉपदेखील जप्त करण्यात आले होते. अखेर बुधवारी नार्कोटिक्स ड्रग्स अॅण्ड सायकोट्रोपिक सब्सटेंस (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयाने रियाच्या बँक खात्यावरील निर्बंध हटवले आहेत. तसेच रियाच्या वस्तू परत करताना न्यायालयाने तिच्याकडून एक लाख रुपयांचा बॉंड लिहून घेण्याचे आदेश दिले आहेत.
जप्त केलेल्या वस्तू परत मिळाव्यात आणि बॅक खाते पूर्ववत सुरू करण्यासाठी रियाने याचिका दाखल केली होती. या याचिकेत तिने म्हटले होते की, व्यवसायाने मी मॉडेल-अभिनेत्री आहे. एनसीबीने कोणतीही पूर्वसूचना न देता 16 सप्टेंबर 2020 पासून माझी बँक खाती आणि एफडी गोठवली आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांचा पगार देण्यात मला अडचणी येत आहेत. जीएसटीसह इतर टॅक्स भरण्यासाठी अकाऊंट ऑपरेट करण्याची गरज आहे. माझा लहान भाऊदेखील माझ्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे बॅक खाती पूर्वस्थितीत करण्यात यावी, अशी विनंती तिने याचिकेत केली होती.
दरम्यान, रियाच्या याचिकेला विरोध करताना एनसीबीचे विशेष वकील अतुल सरपांडे म्हणाले, या प्रकरणाचा आर्थिक तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. बॅंक खाती पूर्ववत केल्यास तपासात अडथळे येतील. त्यातील रक्कम ड्रग्ज माफिया आणि अमली पदार्थांशी संबंधित व्यवसायात गुंतवण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद करत सरपांडे यांनी याचिका फेटाळण्याची मागणी केली.
नियम पाळावे लागणार
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश डी. बी. माने निकाल देताना म्हणाले, तपास अधिकाऱयांच्या जबाबावरून दिसतेय की रियाची बँक खाती, एफडी फ्रीज करण्यासाठी एनसीबीचा कोणताही आक्षेप नाही. पण त्यासाठी रियाला नियम आणि अटींचे पालन करून बँक खाती, एफडीसंदर्भातील माहिती सादर करणे आवश्यक आहे.
























































