महिलेचा विनयभंग करणारा रिक्षाचालक गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चुकीच्या रस्त्याने रिक्षा नेऊन महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या रिक्षाचालकाला खार पोलिसांनी अटक केली. अमरेश कुमार सिंग असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार या एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानात वरिष्ठ पदावर काम करतात. बुधवारी सायंकाळी त्या काम आटपून मैत्रिणीकडे जाण्यासाठी माहीम येथून रिक्षा पकडली. वांद्रे परिसरात आल्यावर अमरेशने रिक्षा चुकीच्या रस्त्याने नेली. तेव्हा महिलेने त्याला रिक्षा चुकीच्या रस्त्याने नेत असल्याचे सांगितले. त्यानंतर अमरेशने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर काही अंतर गेल्यावर अमरेशने रिक्षातच अश्लील कृत्य केले. रिक्षा थांबल्यावर त्या खाली उतरल्या. त्यानंतर महिलेने खार पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना दिली.