क्रूरतेचा कळस; वडिलांसोबतच्या भांडणाचा राग साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यावर काढला; रिक्षातून बाहेर काढत जोरात जमिनीवर आपटलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडिलांसोबत झालेल्या किरकोळ वादाचा सूड घेण्यासाठी एका नराधमाने साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला जमिनीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपीला वसई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

वसई पश्चिमेकडील ‘अनुपम घर संकुल’ सोसायटीत अतुल कोंढारे आपल्या कुटुंबासह राहतात. याच सोसायटीत राहणारा रिक्षाचालक संदीप पवार याच्याशी कोंढारे यांचा काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून संदीपने सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंगावर शहारे आणणारे कृत्य केले.

सोमवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास सोसायटीच्या आवारात मुले खेळत असताना अतुल यांचा मुलगा विघ्नेश खेळता खेळता संदीपच्या रिक्षात बसला. यावेळी आरोपी संदीपने इतर मुलांना हाकलून दिले आणि विघ्नेशला पकडून त्याचे डोके रिक्षाच्या मीटरजवळील लोखंडी अँगलवर जोरात आपटले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. त्याने विघ्नेशला पाय धरून रिक्षातून बाहेर खेचले आणि एखादा कपडा धुताना आपटावा तसे त्याला हवेत भिरकावून जमिनीवर जोरात आपटले. त्यानंतर त्याला फरफटत नेत पहिल्या मजल्यावरील शिडीवर नेऊन पुन्हा मारहाण केली. विघ्नेशची आजी त्याला वाचवण्यासाठी धावून गेली असता नराधमाने त्यांनाही मारहाण केली. ही सर्व घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

दरम्यान, या मारहाणीत विघ्नेश गंभीर जखमी झाला असून त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर मीरा रोड येथील वॉकहार्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे अमानवीय कृत्य केल्यानंतरही आरोपी संदीप पवारला कोणताही पश्चात्ताप नव्हता. “मी बदला घेतला,” अशा निर्लज्जपणे तो सोसायटी सदस्यांना हा सगळा प्रकार सांगत होता.

“आरोपीला आम्ही रात्रीच ताब्यात घेतले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.”

बाळकृष्ण घाडीगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे