सिफ्त कौरचा कांस्यावर नेम, आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजीत मिळवले यश

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत हिंदुस्थानची अव्वल नेमबाज सिफ्त कौर सामराने कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सध्याचा विश्वविक्रम असलेल्या 23 वर्षीय सिफ्तने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत 453.1 गुण मिळवले. नॉर्वेच्या जिनेट हेग डय़ुस्टेडने 466.9 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर स्वित्झर्लंडच्या अमेली जेगीने 464.8 गुणांसह रौप्यपदक जिंकले.

अमेली पात्रता फेरीत 590 गुणांसह नवव्या स्थानावर राहिली होती. मात्र पहिल्या आठमधील दोन नेमबाज फक्त रँकिंग पॉइंट्स (आरपीओ) साठी शूटिंग करत असल्याने तिला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले. पात्रता फेरीत सिफतने नीलिंग, प्रोन आणि स्टँडिंग या तीन टप्प्यांत एकूण 592 गुणांसह दुसरे स्थान मिळवले.

2024च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर तिने या वर्षाच्या सुरुवातीला ब्युनोस आयर्स येथे झालेल्या विश्वचषकात सुवर्णपदक जिंकले होते. फ्रान्सच्या अगाथे सेसील पॅमिल जिरार्डनेही पात्रता फेरीत 592 गुण मिळवले; परंतु आतील 10-पॉइंट क्षेत्रात अधिक शॉट्समुळे ती अव्वल स्थानावर राहिली.

स्वित्झर्लंडच्या ऑद्रे गोग्नियटने पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवले. इतर हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये आशी चोकसीला 589 गुणांसह पात्रता फेरीत 11व्या स्थानावर, तर अंजुम मुदगीलला 586 गुणांसह 27व्या स्थानावर समाधान मानावे लागले. श्रियंका सदांगी 582 गुणांसह 53व्या स्थानावर आणि निश्चलला 60व्या स्थानावर समाधान मानावे लागले.