दंगली घडताहेत म्हणजे निवडणुका जवळ आल्या! भुजबळांचा हल्ला

राज्यात दंगली घडतायेत, याचा अर्थ निवडणुका जवळ आल्या असे समजावे, असे निरीक्षण नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.

हिंदू, मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण व्हावे, हिंदूंचे आम्हीच मसिहा आहोत असे वातावरण तयार करून हिंदूंची मते मिळवावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र जनतेला कायम फसवता येत नाही, हे कर्नाटकच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे भुजबळ यांनी पुढे नमूद केले.

यापूर्वीच्या नोटाबंदीने किती काळा पैसा बाहेर आला याचा आकडा अजून बाहेर यायचा आहे. नोटाबंदी हा नेहमीचाच खेळ झाला आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, शिक्षण या प्रश्नांकडचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे हे उद्योग आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

तपास यंत्रणांचा गैरवापर

विरोधी पक्षांवर दबाव आणण्यासाठी देशभर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. हा प्रयोग माझ्यावरही झाला होता. आता जयंत पाटील यांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. त्यांनी काही केलेलेच नसल्याने कितीही वेळा चौकशी केली तरी काही निष्पन्न होणार नाही, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. ज्यांच्या चौकशा सुरू असतात, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतात, ते भाजपात गेले तर स्वच्छ होतात, अशी लॉण्ड्री वॉशिंग पावडर त्यांच्याकडे आहे, असे भाजपच्याच एका मंत्र्याने म्हटले आहे, असेही ते म्हणाले.