
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ने यावर्षी सर्वांनाच प्रभावित केले. त्याने या चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून भूमिकाही बजावली आहे. अवघ्या 16 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटामध्ये जगभरात 400 कोटींहून अधिक गल्ला जमवला. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा कन्नड चित्रपट ठरला. त्यामुळे चाहते आता ऋषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
याबाबत आता ऋषभ शेट्टी यानेही खुलासा केला असून लवकरच ‘कांतारा-2’ येणार असल्याची खुशखबर चाहत्यांना दिली आहे. ‘कांतारा 2’ हा सिक्वेल नसून प्रीक्वल असेल. कारण या भागात चित्रपटाची कथा खूप वर्षांपूर्वीची असणार आहे, असे सुतोवाच ऋषभ शेट्टी याने केले आहे.
दरम्यान, ‘कांतारा’ सुरुवातीला कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु जेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले तेव्हा तो हिंदी, तमिळ, मल्याळम आणि तेलगूमध्येही प्रदर्शित करण्यात आला होता.
काय आहे कांतारा?
कर्नाटकमधल्या एका छोट्या गावातली गोष्ट ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आली आहे. स्वत:ला राजा म्हणवून घेणारा जमीनदार आणि गावामध्ये राहणारे गरीब, अशिक्षित शेतकरी यांच्यामधील संघर्ष या चित्रपटामध्ये पाहायला मिळतो. रिषभ व्यतिरिक्त सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. दिग्दर्शक अभिनेता अशा दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर पेलत रिषभ शेट्टीने ‘कांतारा’ सुपरहीट करून दाखवला आहे.



























































