ना धोनी, ना संघकारा; गिलख्रिस्टच्या ‘या’ अशक्यप्राय विक्रमाची पंतने केली बरोबरी

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या आणि अंतिम कसोटीमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 1 डाव व 25 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-1 अशी खिशात घातली. या लढतीत टीम इंडियाकडून पहिल्या डावात यष्टीरक्षक ऋषभ पंत याने खणखणीत शतक ठोकले. पंतने 101 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्या एका अशक्यप्राय विक्रमाची बरोबरी केली आहे.

ऋषभ पंत याने पहिल्या डावात वाशिंग्टन सुंदरसोबत मिळून शतकी भागिदारी केली आणि टीम इंडियाला पहिल्या डावात निर्णायक आघाडी मिळवून देण्यास मदत केली. पंतचे घरच्या मैदानात हे पहिले शतक असून या दरम्यान त्याने दिग्गज खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट याच्या विक्रमाची बरोबरी केली. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान अशा तिन्ही देशामध्ये शतक ठोकणारा पंत गिलख्रिस्टनंतर दुसराच यष्टीरक्षक फलंदाज आहे.

गिलख्रिस्टने केले कौतुक

दरम्यान, पंतच्या या शतकी खेळीचे अॅडम गिलख्रिस्ट याने कौतुक केले आहे. तुम्ही किती मिळवता हे महत्वाचे नाही, ते तुम्ही कधी मिळवता हे महत्वाचे आहे. संघाला गरज असतानाही तुम्ही त्यानुसाख खेळी करता तेव्हा तुम्ही खरे मॅचविनर होतात, असे ट्वीट गिलख्रिस्टने केले आहे. या ट्वीटला पंतनेही उत्तर दिले असून गिलख्रिस्टला धन्यवाद दिले आहेत. तसेच तुमचे हे शब्द माझ्यासाठी खूप काही आहेत, असेही पंत म्हणाला.

कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश

अहमदाबाद येथील अंतिम कसोटी सामना टीम इंडियाने 1 डाव आणि 25 धावांनी जिंकला. या कसोटीसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चार कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली आणि कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. क्रिकेटची पंढरी लॉर्डसवर हा सामना रंगणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या