
यष्टिरक्षणापेक्षा आपल्या धडाकेबाज फलंदाजीने ऑस्ट्रेलिया दौरा गाजविणारा ‘टीम इंडिया’चा रिषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नव्याने सुरू केलेल्या मासिक पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. सोमवारी ‘आयसीसी’ने या नव्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. पंतने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला या शर्यतीत मागे टाकले. महिलांमध्ये दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माइलने हा पुरस्कार पटकाविला.
‘आयसीसी’ने जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे पुरुष व महिला गटातील तीन-तीन क्रिकेटपटूंचे या मासिक पुरस्कारासाठी नामांकन केले होते. पुरुष गटात पंतबरोबर जो रूट व आयर्लंडचा पॉल स्टार्ंलग हे या पुरस्काराच्या शर्यतीत होते, तर महिला गटात शबनम इस्माईलला पाकिस्तानची डायना बेग व दक्षिण आफ्रिकेचीच मेरीझान पॅप यांचे आव्हान होते.
जानेवारी महिन्यात हिंदुस्थानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या खडतर दौऱयावर होता. या दौऱयावरील कसोटी मालिकेत रिषभ पंतने दोन सामन्यांत संस्मरणीय खेळ करीत हिंदुस्थानला विजय मिळवून दिला. त्याने तिसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठय़ा आव्हानाचा पाठलाग करताना 97 धावांची धडाकेबाज खेळी होती. चौथ्या कसोटीतही त्याने नाबाद 89 धावा करीत हिंदुस्थानला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला होता. संकटकाळी या दोन बहुमोल खेळय़ा केल्यामुळेच रिषभ पंतला जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पंतने जानेवारी महिन्यात 4 डावांत 81.66 च्या सरासरीने 245 धावा फटकावल्या. याचबरोबर यष्टीमागे चार झेलही टिपले व एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळवला. त्यामुळे आयसीसीची मतदान समिती आणि चाहत्यांनी पंतच्या बाजूने सर्वाधिक मते देऊन त्याची या पुरस्कारासाठी निवड केली.




























































