
हिंदुस्थानी वंशाचे ऋषी सुनक यांचा ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून निवडून येण्यासाठी पहिल्या फेरीत सर्वाधिक 88 मते मिळाली आहेत. या जोरावर त्यांनी दुसऱया फेरीत सहज प्रवेश केला.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सुनक यांच्याशिवाय परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस, वाणिज्य मंत्री पेनी मोर्डेंट, माजी कॅबिनेट मंत्री केमी बादेनोक, खासदार टॉम तुगेंदत आणि ब्रिटिश कॅबिनेटमधील ऍटर्नी जनरल सुएला ब्रेवरमॅन हे उमेदवार उतरले होते. बुधवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते निवडण्याच्या पहिल्या फेरीतील मतदान झाले. या मतदानामध्ये सुनक यांनी सर्वाधिक मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठा धक्का दिला. वाणिज्य मंत्री पेनी मॉर्डेंट यांना 77 तर परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांना 55 मते मिळाली. माजी कॅबिनेट मंत्री जेरेमी हंट आणि विद्यमान कुलपती नदीम जाहवी यांनी पहिल्या फेरीच्या मतदानानंतर शर्यतीतून माघार घेतली. पुढच्या फेरीत जाण्यासाठी आवश्यक 30 मते मिळवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे सुनक यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आणखी सोपा झाला आहे. सुनक यांनी यापूर्वी ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे. 5 सप्टेंबरला नवीन पंतप्रधानांची निवड जाहीर केली जाणार आहे.



























































