
वसईतील पेल्हार गावातील दोन वर्षांच्या चिमुकल्या रियान शेखला उपचारासाठी नेणारी रुग्णवाहिका मुंबई-अहमदाबाद मार्गावरील तुफान वाहतूककोंडीत अडकली. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने रियानचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वसईच्या पेल्हार परिसरात राहणारा दोन वर्षांचा रियान शेख हा गुरुवारी दुपारी गच्चीवरून कोसळला. या घटनेत त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने जवळच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमोपचार केले आणि त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रियानचे कुटुंबीय दुपारी अडीच वाजता रुग्णवाहिकेद्वारे मुंबईकडे निघाले. पण मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होती. या वाहतूककोंडीत रुग्णवाहिका 5 तास अडकून होती.
मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी बांबूच्या झोळीचा आधार; जव्हारमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना
वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रियानवर उपचार करण्यास विलंब होत होता. यामुळे रियानच्या कुटुंबीयांनी त्याला जवळच्याच गावातील एका लहान रुग्णालयात नेले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी रियानला तपासून मृत घोषित केले. वाहतूककोंडीमुळे रियानचा जीव गेल्याने वसई परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.