
सामना ऑनलाईन । मुंबई
‘शोमॅन’ राज कपूर यांनी सुमारे 70 वर्षांपूर्वी बांधलेला चेंबूरचा ऐतिहासिक आर.के.स्टुडिओ आता इतिहासजमा होणार आहे. हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय आता कपूर कुटुंबीयांनी घेतला आहे. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा देत काळजावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
चित्रपटसृष्टीचे सुवर्णयुग पाहिलेला चेंबूर शिव-ट्रॉम्बे मार्गावरील आर.के.स्टुडिओ हा राज कपूर यांनी 1948 साली उभारला होता. 2 एकर जागेवर उभारलेल्या या स्टुडिओला हिंदी चित्रपटसृष्टीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा स्टुडिओ म्हणजे राज कपूर यांच्यासाठी दुसरे घरच होते. होळी, गणेशोत्सव हे सण येथे धूमधडाक्यात साजरे केले जायचे. राज कपूर यांच्या मृत्यूनंतर या स्टुडिओची सूत्रे कपूर कुटुंबीयांकडे आली होती. भविष्यात कपूर कुटुंबातील भावी पिढीमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून कायदेशीर लढाई उद्भवू नये, त्यामुळे राज कपूर यांची पत्नी कृष्णा कपूर यांनी तीन मुले रणधीर कपूर, राजीव कपूर आणि ऋषी कपूर आणि दोन मुली रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकत्रित स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे.
“गतवर्षी स्टुडिओला लागलेल्या आगीमुळे या वास्तूचे आणि संग्रहीत केलेल्या आठवणींचे प्रचंड नुकसान झाले. स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न कमी असून देखभालीचा खर्च त्याहून अधिक आहे. त्यामुळे हा पांढरा हत्ती सांभाळण्यात अनेक अडचणी येत आहेत. आम्ही सर्व भाऊ एकमेकांच्या खूप जवळ आहोत. परंतू आमची मुले, नातवंडे अशीच असतील असे नाही. त्यामुळे आम्ही काळजावर दगड ठेवून पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे.” – ऋषी कपूर, ज्येष्ठ अभिनेते


























































