२०० कोटीच्या निधीतून ३ तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे बुधवारी भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळगाव

चोपडा, यावल आणि जळगाव या तीन तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे. दि.१६ जानेवारी रोजी या रस्त्यांचे जळगाव येथील के. सी.पार्क जवळ भूमिपूजन केले जाणार आहे. याप्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

तालुक्यातील आसोदा येथे सकाळी ९ वाजता, भोकर येथे सायंकाळी ४ वाजता व चोपडा येथे सायंकाळी ५.३० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चोपडा-भोकर- कानळदा- जळगाव या राज्य मार्ग रस्ता क्रमांक ४० आणि यावल -शेळगाव -भादली- असोदा -जळगाव या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ या २ रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. या दोन्ही कामांसाठी अनुक्रमे १११ कोटी व ८९ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी जळगावचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून मंजुरी मिळवली आहे. या दोन्ही कामांना आज प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आधार देण्यासाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेले प्रसिद्ध सिने अभिनेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्नेही मित्र मकरंद अनासपुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

अभिनेते मकरंद अनासपुरे हे शेतकरी बांधवांसमवेत संवाद साधणार आहेत. असोदा येथे सकाळी ९वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर भोकर येथे सायंकाळी ४ वाजता तर चोपडा येथे ५.३० वाजता भव्य जाहीर सभा पार पडणार आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, सहसंपर्क प्रमुख तथा माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील, खासदार रक्षा खडसे, ए. टी. पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, शिवसेनेचे, युवासेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.