लातूरमधील चिंचोली-बल्लाळनाथ ते मांजरी रस्त्याची दुरावस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील मौजे-चिंचोली-बल्लाळनाथ ते मांजरी या 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता उखडून गेलेला असून त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

लातूर तालुक्यातील मौजे चिंचोली बल्लाळनाथ ते मांजरी हा रस्ता साधारणपणे 10 वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला होता. त्यानंतर आजपर्यंत या रस्त्याची कधीच साधी दुरुस्तीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. चिंचोली-बल्लाळनाथ या रस्त्यावर शेतशिवारेही जास्त प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाताना मोठी अडचण होते. दुचाकी, चारचाकी वाहने आणि बैलगाडी चालवणे अवघड होते. यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.