प्राणघातक हल्ला करून गृहिणीचे मंगळसूत्र लुटले, घरात घुसून चोरांचे गंभीर कृत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जिओ फायबरवाले है’ असे सांगत घरात घुसलेल्या दोघा अज्ञातांनी गृहिणीच्या तोंडात बोळा काsंबून तसेच बरगडीच्या खाली चाकू भोसकून महिलेच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना हिंदमाता येथे घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदमाता येथील सेंट पॉल स्ट्रीटवर असलेल्या आराधना इमारतीत सुचिता ऊर्फ स्मिता (59) व त्यांचे पती विजय मालवणकर (66) असे दोघे राहतात. शुक्रवारी दोघेही घरात क्रिकेटचा सामना बघत बसले होते. पण 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक टीव्ही बंद पडला. जिओ फायबरचे नेट टीव्हीला कनेक्ट असल्याने टीव्ही बंद पडला असावा असा दोघांचा समज झाला. दरम्यान, 6 वाजण्याच्या सुमारास विजय हे दादर टी. टी. येथे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी गेले. 7.15 वाजण्याच्या सुमारास स्मिता या घरात एकटय़ाच असताना दोन इसम घरात घुसले आणि ‘जिओ फायबरवाले है’ असे म्हणाले. त्यामुळे टीव्ही बंद पडल्याने इंटरनेट कनेक्शन करण्यासाठी आले असावे असे स्मिता यांना वाटले. स्मिता मागच्या बाजूला फिरल्या असता आरोपीने त्यांच्या तोंडात बोळा काsंबला आणि त्यांच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. त्यानंतर कपाटाच्या चावीची मागणी करू लागले, पण स्मिता यांनी चावी न दिल्याने त्यातील एकाने स्वयंपाकघरातील चाकू घेऊन तो स्मिता यांच्या डाव्या बाजूच्या बरगडीखाली खुपसला आणि दोघांनी तेथून पळ काढला. जखमी स्मिता यांना केईएम रुग्णालयात दाखल केले असून भोईवाडा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.