वलांडीत भरदिवसा भरवस्तीत घरफोडी; तीन आठवड्यातील दुसरी घटना

1520

वलांडी (ता. देवणी) येथील भरवस्तीत शुक्रवारी भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी सोन्यासह रोख रक्कम लंपास केली. या चोरीत चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. वलांडी येथील जुन्या पोलीस चौकीजवळ शिवशंकर काशीनाथ महाजन यांचे घर आहे. शुक्रवारी शिवशंकर महाजन व त्यांच्या पत्नी गावी गेले होते. सांयकाळी 5 वाजता घरी परतल्यानंतर घराचे कुलुप काढल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नातलगासह शेजाऱ्यांसोबत घरामागच्या बाजूने दरवाजा उघडला. त्यानंतर त्यांच्या घरातील सर्वच साहित्य अस्ताव्यस्त व विखरलेले होते. त्यांनी स्वयंपाकघरातील साहित्यात दडवून ठेवलेले 10 तोळे सोन्याचे दागीने, पाच तोळे चांदीचे दागिणे व कपाटातील रोख पंचवीस हजार रुपये चोरल्याचे लक्षात आले.

स्वयंपाकघरातील तिखट मिठापासून शेंगदाणे, शेंगदाण्याच्या चटणीपासून पापड खारोड्यापर्यंत सर्व डबे चोरट्यांनी उघडले. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील दोन्ही कपाटे फोडली होती. त्यातील प्रत्येक वस्तु अस्ताव्यस्त पडली होती. त्यावरून घरात किमान दोन ते तीन तास थांबत चोरट्यांनी शांतपणे चोरी केल्याचे लक्षात येत आहे. घरात येणारे सर्वच दरवाजे आतुन बंद करुन चोरट्यांनी चोरी केली आहे. वलांडीच्या आठवडी बाजाराची प्रचंड वर्दळ असताना, संक्रातीच्या हळदी-कुंकवाला जाणाऱ्या महिलांची मोठी वर्दळ असताना भर वस्तीतील घर फोडत चोरी झाल्याने गावात दहशत व घबराटीचे वातावरण आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला. तसेच रात्री उशीरापर्यंत देवणी पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. वलांडीचा आठवडी बाजार शुक्रवारी असून भर बाजारापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महाजन यांच्या घरी पूर्वनियोजीत व पद्धतशीर चोरी करीत चोरट्यांनी पोलिसांसमोरच आव्हान निर्माण केले आहे. एक महिन्याच्या आतच दिवसा दुसरी चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या