यवतमाळ जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त, सहा आरोपींना अटक

596

यवतमाळ शहरासह जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी, मंगळसूत्र चोरीचे सत्र वाढले आहे. परराज्यातील चोरट्यांसह स्थानिक चोरटे मुद्देमाल लंपास करीत आहे. चोरट्यांचा हा धुमाकूळ सुरू असतानाच सात देशी पिस्तुले, 118 जिवंत काडतूसे, 17 चाकू, सात तलवारी, असा शस्त्रसाठा आणि 22 दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. या प्रकरणी एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील अनुप्रभा हॉटेल समोरून अमजद खान सरदार खान, देव ब्रम्हदेव राणा, मोहम्मद सोनू मोहम्मद कलाम यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमजद खान याच्या घरझडतीत सहा पिस्तुले व 115 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दिग्रस शहरात सापळा रचून मोहमद आसीफ मोहमद अफजल, सागर रमेश हसनापुरे यांच्याकडून देशी कट्टा, तीन काडतुसे, 17 धारदार चाकू, सात तलवारी जप्त करण्यात आल्या. तसेच चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून आठ घरफोडी व सहा चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.

कुख्यात सहा संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 14 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नांदेड येथून शस्त्र आणून त्याची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू होता. संशयितांकडे केलेल्या चौकशीदरम्यान कुख्यात दुचाकी चोर लखन राठोड पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून 22 दुचाकी जप्त करण्यात आल्या. यातील 12 दुचाकी यवतमाळ जिल्हा, दोन वाशीम, दोन बुलढाणा येथून चोरून आणल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या