
‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या तेरावा मासिक कार्यक्रम दत्तराज सोसायटीच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी ‘गूढ कातळशिल्पांचे’ या विषयावर सादरीकरण केले. विविध कातळशिल्पांची छायाचित्रे आणि माहितीच्या आधारे त्यांनी पुरातत्वशास्त्र, मानवी उत्क्रांती, प्रागैतिहासिक काळ याची ओळख करून दिली. अश्मयुगीन मानवाच्या कलेचा प्रथम आविष्कार असलेली शैलचित्रे किंवा गुहाचित्रे आणि पाषाणकला (रॉक आर्ट) याची शास्त्राrय माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी जगाच्या विविध भागांसह पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ राज्यातील कातळशिल्पांचा आढावा घेतला आहे. त्यापैकी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत समावेश केलेल्या रत्नागिरी जिह्यातील सात, सिंधुदुर्ग जिह्यातील हिवाळे, कुडोपी आणि खोटले, गोव्यातील पॉन्साइमळ येथील कातळशिल्पांची वैशिष्टये आणि त्यांची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना दिली. यावेळी व्यासपीठाच्या सह समन्वयक डॉ. सई लळीत, मनोहर सरमळकर, पुरुषोत्तम कदम, स्टेट बँकेचे शाखाधिकारी गौतमी महाजन, ग्राहक मंचाचे सदस्य विष्णुप्रसाद दळवी, निखिल नेरकर, मारी फर्नांडिस (मालवण), नारायण परब, महेंद्र परब (हिवाळे) आदी उपस्थित होते. सिमरन वाळके यांनी व्यवस्थापन पाहिले.
अज्ञान, अनास्था हा वारसा संवर्धनातील सर्वात मोठा अडथळाः सतीश लळीत
सिंधुदुर्ग जिह्याचा प्रागैतिहासिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, जैवविविधता विषयक वारसा अतिशय समृद्ध आहे. मात्र या वारशाबाबत पुरेशी जागृती नाही. अज्ञान आणि अनास्था यामुळे अनेक वारसास्थळे धोक्यात आली आहेत. चिरेखाणींमुळे कातळशिल्पे मोठय़ा प्रमाणात नष्ट होत आहेत. कोकणी वास्तुस्थापत्याचा आविष्कार असलेली वैशिष्टय़पूर्ण प्राचीन मंदिरे पाडून सिमेंट काँक्रीटची अवाढव्य आधुनिक मंदिरे उभारली जात आहेत. लोककलाही मूळ स्वरुपात सादर न करता त्यात अनावश्यक बदल केले जात आहेत. वारसा आहे त्या स्वरूपात टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासनानेही याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी खंत यावेळी संशोधक लळीत यांनी व्यक्त केली.






























































