अमेरिकन ओपन : विश्वविक्रमी फेडररचा इतिहासात पहिल्यांदाच ‘असा’ पराभव

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस खेळाडू रॉजर फेडररचे अमेरिकन ओपनमधील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅन याने फेडररचा चार सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात 3-6, 7-5, 7-6 (7), 7-6 (3) असा पराभव केला. अमेरिकन ओपनच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की फेडररला जागतिक क्रमवारीत पहिल्या 50 मध्येही नसलेल्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. मिलमॅन जागतिक क्रमवारीमध्ये 55 व्या स्थानावर आहे.

आर्थर अॅश स्टेडिअमवर खेळलेल्या गेलेल्या सामन्यात फेडरर थकल्यासारखा जाणवला. पहिला सेट 3-6 असा आरामात खिशात टाकल्यानंतर सलग तीन सेटमध्ये टायब्रेकरवर फेडररला पराभव स्वीकारावा लागला. हा सामना तब्बल 3 तास 35 मिनिटे चालला. या पराभवामुळे उपांत्यपूर्व फेरीत फेडरर आणि जोकोविचमधील सामना पाहण्याच्या आनंदाला टेनिसप्रेमींना मुकावे लागले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचचा सामना मिलमॅनशी होईल.

दरम्यान, अमेरिकन ओपनमध्ये 14 वेळा सहभागी झालेल्या फेडररचा पराभव केल्यानंतर मिलमॅन म्हणला की, ‘रॉजर फेडरर माझा हिरो आहे. आतापर्यंत त्याने या खेळासाठी जेवढे केले आहे त्यासाठी त्याचा सन्मानच करायला हवा.’