गॅस सिलिंडरच्या रांगेत वृद्धाचा मृत्यू, रोहिणी खडसेंनी भाजपच्या महिला आमदाराला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी राज्यात सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे जरी सांगत असले तरी अनेक ठिकाणी सिलिंडरसाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहे. या रांगांमध्ये काही जणांचा मृत्यूही झाल्याचे समोर आले आहे. असाच प्रकार अकोल्यातही घडला आहे. अकोल्यातील माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना आपला जीव गमवावा लागला. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपच्या महिला आमदारावर जोरदार निशाणा साधला आहे.

”जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत.‌ त्यांना जरा हा फोटो दाखवा. अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे. ‘सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल’ असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी”, असे रोहिणी खडसे यांनी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांना सुनावले आहे.

काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करत असताना २५ दिवसांत गॅस सिलिंडर मिळतो, गॅस बूक करा असे विधान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केले होते. त्यावरून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावरती नाव न घेती टीका केली आहे.