
नगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सोमवारी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . 30 जून रोजी ऑनलाइन पद्धतीने निवडणूक होणार आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या आवारामध्ये जय भवानी जय शिवाजी, महाविकास आघाडीचा विजय असो, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी विक्रम राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्ष नेता संपत बारस्कर, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
नगर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरिता शिवसेनेचा रोहिणी शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सोमवारी आपले चार उमेदवारी अर्ज महापौर पदाकरता दाखल केले आहेत. या अर्जावर सूचक म्हणून पुष्पा बोरुडे तर अनुमोदक म्हणून अनिल शिंदे दुसऱ्या अर्जावर सुरेखा कदम सूचक तर गणेश कवडे अनुमोदक म्हणून आहेत तिसऱ्या अर्जावर अशोक बडे हे सूचक असून विजय पठारे हे अनुमोदक आहे. चौथ्या अर्जावर सुवर्णा गेनाप्पा या सूचक असून विद्या खैरे या अनुमोदक आहेत. महापौर व उपमहापौर पदाच्या निवड होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून डॉक्टर राजेंद्र भोसले हे राहणार आहे. ऑनलाइन पद्धतीने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकरता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
महापौरपदाच्या उमेदवार रोहिणी शेंडगे यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षापासून आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला महापौरपदासाठी संधी दिली त्याकरता मी त्यांची आभारी आहे. तसेच या महानगरपालिकेमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी महाविकास आघाडीची निवडणूक एकत्रितपणे आम्ही लढणार आहोत. आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. निवडणुकीनंतर आम्ही सर्वजण नगर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सर्व महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे सुद्धा आपण आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.
























































