
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवाार यांच्या विमानप्रवासाशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ब्रेथ अनालायझर चाचणीपासून ते पायलटच्या ट्रॅक रेकॉर्डपर्यंत विविध मुद्द्यांवर सखोल चौकशीची मागणी केली.
ब्रेथ अनालायझर चाचणी आणि सीसीटीव्हीबाबत प्रश्न
रोहित पवार म्हणाले की, विमानतळावर पायलटची ब्रेथ अनालायझर चाचणी झाली होती का, याची चौकशी झाली पाहिजे. पोलिस जशी मद्यपान तपासणी करतात, तशीच अत्याधुनिक ब्रेथ अनालायझर यंत्रणा विमानतळांवर डीजीसीएने उपलब्ध करून दिलेली असते. या चाचणीदरम्यान फोटो घेतले जातात आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंगही असते. त्या दिवशी ही चाचणी झाली का? कॅमेरे कार्यरत होते का? त्यांचे रेकॉर्ड कोणाकडे आहेत? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
त्यांनी पुढे सांगितले की, जर पायलट सात वाजता विमानाजवळ पोहोचला आणि दादा आठ वाजता पोहोचले, तर त्या एक तासाच्या काळात विमानाची तपासणी झाली का? विमानात काही वेगळे ठेवले गेले होते का? असेही प्रश्न उपस्थित होतात. या सर्व बाबींची तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पायलट आंतरराष्ट्रीय उड्डाणावरून आला होता का?
रोहित पवार यांनी दावा केला की, पायलट कपूर हा हाँगकाँगहून आंतरराष्ट्रीय उड्डाणावरून आला होता, असे सांगितले जाते. ते खरे होते का, याचीही चौकशी व्हावी. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये मद्य दिले जाते. जर त्या पायलटला मद्यपानाची सवय असल्याची माहिती असेल, तर तो मद्यपान करून आला होता का, हे तपासणे आवश्यक आहे.
रोहित पवार म्हणाले की, “कदाचित त्यांच्या कुटुंबाला वाटेल की मी काहीतरी वेगळं बोलतोय. पण आमचा माणूस गेला आहे. आमच्या शंका दूर होणं हा आमचा हक्क आहे. जोपर्यंत उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मला झोप लागणार नाही.”
मुख्य पायलट सुमित कपूरचा पूर्वीचा ट्रॅक रेकॉर्ड
रोहित पवार यांनी सांगितले की, मुख्य पायलट सुमित कपूर याचा पूर्वीचा ट्रॅक रेकॉर्ड तपासण्याची गरज आहे. त्यांच्या मते, 10 मार्च रोजी दिल्ली-बेंगळुरू उड्डाणापूर्वी प्री-फ्लाइट अल्कोहोल टेस्टमध्ये तो पकडला गेला होता. तसेच 17 एप्रिल रोजी दिल्ली-गुवाहाटी उड्डाणादरम्यानही तो चाचणीत सापडला होता. या प्रकरणात त्याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते.
ते म्हणाले की, या घटना व्यावसायिक उड्डाणांमध्ये घडल्या. कमर्शियल फ्लाइट्समध्ये नियम अधिक कडक असतात. मात्र खासगी उड्डाणांमध्ये तेवढी कडक अंमलबजावणी नसावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
प्रशिक्षणाबाबतही प्रश्न
पवार यांनी सांगितले की, लेअरजेटसारखे विमान उडवण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण घ्यावे लागते. कमर्शियल पायलट असला तरी वेगळ्या विमानासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आवश्यक असते.
सुमित कपूर अमेरिकेतील बॉम्बार्डियर कंपनीच्या फॅक्टरीत प्रशिक्षणासाठी गेला होता, अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तिथे जाऊन त्याने मद्यपान केल्यामुळे प्रशिक्षण पूर्ण झाले नाही, अशीही माहिती समोर आली असून त्याची पडताळणी करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोठ्या नेत्याची तक्रार असल्याचा दावा
रोहित पवार यांनी सांगितले की, एका मोठ्या नेत्याने त्यांच्या घरी येऊन सांगितले होते की, नांदेडला जाताना याच पायलटने त्यांचे विमान उडवले होते. त्यावेळी केलेल्या लँडिंगबाबत त्यांनी कंपनीकडे तक्रार केली होती. तो नेता कोण होता, तो नांदेडला कधी गेला होता आणि त्याने तक्रार केली होती का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
खराब ट्रॅक रेकॉर्ड असूनही व्हीआयपी उड्डाणे का?
पवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, जर या पायलटचा ट्रॅक रेकॉर्ड खराब होता, तर त्याला अजित पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांसारख्या व्हीआयपींची विमाने उडवण्याची परवानगी का देण्यात आली?
कंपनीच्या ग्रुपमधील संदेशांवरही प्रश्न
रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या एका ग्रुपमधील काही संदेशांचा उल्लेख केला. त्यानुसार, एका संदेशात “एक महत्त्वाचे उड्डाण रद्द करावे लागले, कारण पायलट खूप मद्यधुंद होता,” असा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
त्या संदेशात कॅप्टन सुमितचा “द ग्रेट” असा उल्लेख करण्यात आला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच कंपनीच्या संचालकाचा मुलगाही पायलट असून तोही दारू पित असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या मते, जर संचालकच नियमांचे पालन करत नसेल, तर इतर पायलटांमध्येही निष्काळजीपणा वाढू शकतो.
इतर संदेशांतील ‘स्टंट’चा उल्लेख
आणखी एका संदेशात “स्टंट करू नका” असा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. हा ‘स्टंट’ म्हणजे वेडेवाकडे उड्डाण करणे, मद्यपान करणे किंवा ड्रग्ज घेणे, यापैकी काय, याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.
सरकारी अहवालांतील विसंगतीचा मुद्दा
रोहित पवार यांनी सरकारी अहवालांतील विसंगतींचाही उल्लेख केला. पीआयबी आणि डीजीसीएकडून दिलेल्या माहितीत फरक असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
तसेच बारामती एटीसीच्या ट्रान्सक्रिप्टचा उल्लेख करत, विमानातील अधिकारी आणि एटीसीमधील महिला अधिकाऱ्यांमधील संवादाचे रेकॉर्ड तपासण्याची मागणी त्यांनी केली.
सखोल चौकशीची मागणी
या सर्व मुद्द्यांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. “आमच्या शंका दूर झाल्या पाहिजेत. सत्य समोर आले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.



























































