अजितदादा, त्यासाठी काळीज, जिवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं, रोहीत पवारांचा टोला

देशातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाचा प्रचार रविवारी थंडावला. रविवारी बारामती येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची प्रचार सांगता सभा पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांना अश्रूी अनावर झाले. त्याच नंतर अजित पवार यांची देखील सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी रोहीत पवार यांच्या रडण्याची नक्कल करून दाखवली. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

 

दरम्यान अजित पवार यांनी नक्कल केल्यानंतर रोहीत पवार यांनी सोशल मीडियावरून त्याच्यावर टीका केली आहे. ”अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण ED ची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यातील अश्रूप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यातील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर साहेब जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत आणि त्यासाठी विचार, काळीज, जीवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं अजितदादा. आणि हो वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाण हृदयी नाही”, असा टोला रोहीत पवार यांनी अजित पवारांना लगावला