मुंबईकरांचा सुपरहिट शो! हिंदुस्थान पहिल्या दिवशी 6 बाद 300 धावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या कसोटीत सपाटून मार खाणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाने शनिवारपासून चेन्नईत सुरू झालेल्या दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी चमक दाखवली. रोहित शर्मा (161 धावा) व उपकर्णधार अजिंक्य रहाणे (67 धावा) या दोन मुंबईकर फलंदाजांनी दिवस गाजवला.

मात्र अखेरच्या सत्रात टीम इंडियाने तीन गडी गमावल्यामुळे इंग्लंडला या कसोटीत कमबॅक करता आले आहे. रोहित शर्माचे सातवे खणखणीत शतक व अजिंक्य रहाणेच्या 23 व्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर हिंदुस्थानने पहिल्या दिवसअखेरीस 6 बाद 300 धावा केल्या असून आता खेळपट्टीवर रिषभ पंत (33 धावा) व अक्षर पटेल (5 धावा) हे दोन फलंदाज खेळत आहेत.

पुजारा, कोहली एका धावेच्या अंतरात बाद

रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा या जोडीने दुसऱया विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडी खेळपट्टीवर स्थिरावणार असे वाटत असतानाच डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच इंग्लंडसाठी धावून आला. त्याने चेतेश्वर पुजाराला स्लिपमध्ये उभ्या बेन स्टोक्सकरवी झेलबाद केले. चेतेश्वर पुजाराने दोन चौकारांसह 21 धावा केल्या.

त्यानंतर फलंदाजीला आलेला कर्णधार विराट कोहलीही झटपट बाद झाला. ऑफस्पिनर मोईन अलीच्या गोलंदाजीवर त्याची दांडी गुल झाली. एक धावेच्या अंतरात दोन फलंदाज बाद झाले.

162 धावांची शानदार भागीदारी

विराट कोहली बाद झाल्यानंतर रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे या जोडीने चौथ्या विकेटसाठी 162 धावांची शानदार भागीदारी रचली. या भागीदारीत दोघांनी चोहोबाजूंनी नेत्रदीपक फटके मारत स्टेडियममधील प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मात्र जॅक लीचच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा 161 धावांवर मोईन अलीकरवी झेलबाद झाला.

या खेळीत त्याने दोन षटकार व 18 चौकार चोपून काढले. यानंतर टीम इंडियाच्या धावसंख्येत एक धावेची भर पडताच अजिंक्य रहाणेही बाद झाला. मोईन अलीने 67 धावांवर त्याचा त्रिफळा उडवला.

धावफलक

हिंदुस्थान – पहिला डाव – रोहित शर्मा झे. अली गो. लीच 161, शुभमन गिल पायचीत गो. स्टोन 0, चेतेश्वर पुजारा झे. स्टोक्स गो. लीच 21, विराट कोहली त्रि. गो. अली 0, अजिंक्य रहाणे त्रि. गो. अली 67, रिषभ पंत खेळत आहे 33, रविचंद्रन अश्विन झे. पोप गो. रूट 13, अक्षर पटेल खेळत आहे 5.
हिंदुस्थान 88 षटकांत 6 बाद 300.

बाद क्रम – 1-0, 2-85, 3-86, 4-248, 5-249, 6-284.
गोलंदाजी – ब्रॉड – 11-2-37-0, स्टोन – 15-5-42-1, लीच – 26-2-78-2, स्टोक्स – 2-0-16-0, अली – 26-3-112-2, रूट – 8-2-15-1.