INDvENG टीम इंडियामागील शुक्लकाष्ट संपेना, रोहित-पुजारा मैदानातून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगतदार अवस्थेत आलेल्या ओव्हल कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. इंग्लंडचा संपूर्ण संघ बाद करून 50 वर्षांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानचा संघ या मैदानावर विजयी झेंडा फडकावतो का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. मात्र ओव्हल कसोटी सुरू असतानाच मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने टीम इंडियाला धक्का बसला. एवढेच नाही तर टीम इंडियाला आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी मैदानात पाऊल न ठेवल्याने विराटपुढील आव्हान वाढले आहे.

रविवारी बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करत रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात उतरणार नाहीत याची माहिती दिली होती. रोहितच्या डाव्या पायाच्या घुडघ्याला तर पुजाराच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आहे. दोघांवर बीसीसीआयच्या मेडिकल पथकाची नजर असल्याचे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले होते.

चौथ्या दिवशी दोघांनीही क्षेत्ररक्षण केले नाही. एवढेच नाही तर पाचव्या दिवशी देखील दोघे मैदानात उतरले नाही. दोघांच्या जागी मयंक अग्रवाल आणि सूर्यकुमार यादव हे बदली खेळाडू क्षेत्ररक्षण करत आहेत. दोघांच्या पायाचे स्कॅन करण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. या अहवालावर सर्व अवलंबून असून ते पुढील सामना खेळतील की नाही याची माहिती मिळेल.