INDvENG ‘हिटमॅन’ रोहितने केला खास विक्रम, ‘द वॉल’ द्रविडसह गॉर्डन ग्रीनिजला सोडलं मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओव्हल कसोटीमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा याने शतकी खेळी केली. रोहित शर्माचे विदेशातील हे पहिलेच शतक असून या शतकासह त्याने टीम इंडियाचा माजी खेळाडू ‘द वॉल’ राहुल द्रविड याचा एक खास विक्रम मोडला आहे.

के.एल. राहुलसोबत सलामीला आलेल्या रोहित शर्मा याने दुसऱ्या डावात तुफानी फलंदाजी करत इंग्लंडला वर्चस्व गाजवण्याची संधी दिली नाही. रोहित शर्मा याने 353 मिनिटांच्या फलंदाजीमध्ये 256 चेंडूंचा सामना करत 127 धावा चोपल्या. यात त्याच्या 14 चौकारांचा आणि एका उत्तुंग षटकाराचाही समावेश आहे.

INDvENG – टीम इंडियाला धक्का, मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह

चौथ्या कसोटीतील शतकी खेळीसह रोहित शर्मा याने इंग्लंडमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याचा विक्रम केला. रोहित शर्मा याने इंग्लंडच्या जमिनीवर सर्वाधिक 9 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. याआधी 8 शतकांसह राहुल द्रविड याच्या नावावर हा विक्रम होता. तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर असून इंग्लंडमध्ये त्याच्या नावावर 7 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे.

रोहित शर्मा याने या शतकासह राहुल द्रविडच नाही तर वेस्ट इंडिजचे दिग्गज सलामीवीर खेळाडू गॉर्डन ग्रीनिज यांचाही विक्रम मोडला आहे. इंग्लंडमध्ये सलामीला येताना आता सर्वाधिक 9 शतकांची नोदं रोहितच्या नावावर झाली आहे. गॉर्डन ग्रीनिज यांनी 8, ग्रीम स्मिथने 5 आणि मार्क टेलरने 5 शतके झळकावलेली आहेत.

ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

इंग्लंडमध्ये विदेशी खेळाडू म्हणून खेळताना सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये तब्बल 11 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. पाचव्या कसोटीतील दोन्ही डावात शतक झळकावून ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी रोहितकडे आहे.

15 हजार आंतरराष्ट्रीय धावा

रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा टप्पाही पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून अशी कामगिरी करणारा तो आठवा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विरेंद्र सेहगाव आणि मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूंनी याआधी अशी कामगिरी केलेली आहे.