‘रो-को’चा विजयी धमाका, रोहित 121 कोहली 74

सिडनी Š ‘ते दोघं आले… ते दोघं खेळले आणि त्यांनी मैदान गाजवलं…’ अशी परिस्थिती आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात दिसली. आज खऱया अर्थाने ऑस्ट्रेलियाचा दौरा ‘रो-को’ या दोन नावांच्या भोवती फिरताना दिसला. ऑस्ट्रेलियाच्या 236 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने नाबाद 121 धावांची खेळी केली तर विराट कोहलीने नाबाद 74 धावा फटकावून 9 विकेट राखून विजय मिळवला. खऱया अर्थाने ते दोघेच एकदिवसीय क्रिकेटचे ‘किंग’ असल्याचे दाखवून देत टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. ऑस्ट्रेलियाचा तब्बल 9 विकेट आणि 69 बॉल राखून पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेचा शेवट गोड होऊन व्हाइट वॉशचा धोका टळला.

हिटमॅन तो हिटमॅनच

कर्णधारपद काढून घेतल्यानंतर हिटमॅन रोहित शर्माने फलंदाजीत धमक दाखवून देत टीकाकारांचे तोंड बंद केले आहे. रोहितने वयाच्या 38 व्या वर्षी सिडनी येथे कारकिर्दीतील 33 वे शतक साजरे केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे हे नववे शतक ठरले. या शतकासह हिटमॅनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकांचा टप्पा गाठला आहे.

विराटचे विक्रमी अर्धशतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर तिसऱया सामन्यात विराटच्या खेळीकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. तिसऱया सामन्यात मैदानावर उतरल्यानंतर विराटने पहिली धाव घेताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. आज विराटने पहिल्या दोन सामन्यांतील अपयश पुसून टाकले. विराटने 81 चेंडूंत 74 धावांची खेळी केली.