
सामना ऑनलाईन । मुंबई
कोकणच्या लाल मातीत चित्रित झालेला ‘रोपटं’ हा चित्रपट महाराष्ट्रासह सर्वच ठिकाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सामाजिक दिशा देणारा आणि राजापूरच्या वाटूळ गावाची एक नवी ओळख निर्माण करणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्यामुळे पहिल्याच शोच्या अगोदर थिएटर हाऊसफुल झाले आणि पुढील शो हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत.
एका सामान्य कुटुंबातील ध्येयवेड्या तरुणाचे गावासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न, त्याला घरच्यांनी दिलेली साथ त्यातून साकारलेला रोपटं हा चित्रपट. चित्रपटसृष्टीची फारशी ओळख नसणारा तरुण स्वतः भोवतीच्या निसर्गाचा आणि सामाजिक गोष्टींचा योग्य अभ्यास करून चित्रपट निर्मिती करतो. स्वतःची पदरमोड करत मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो. रोपटंच्या सुरुवातीच्या या प्रवासानेच प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्यातच कोकणचा निसर्गरम्य परिसर कायमच लोकांचं लक्ष वेधून घेत असतो. यामुळे प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवण्यात ‘रोपटं’ यशस्वी ठरला.
रोपटं 31 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. वाटुळ गावचे मुख्य मानकरी विश्वासराव चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. रोपटंच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत फार क्वचित वेळा घडणारी गोष्ट घडली. प्रदर्शनापूर्वीच हाऊसफुल होणाऱ्या चित्रपटांच्या पंक्तीत बसण्याचा मान रोपटंने मिळवला. आकांक्षा पिक्चर्सनिर्मित हा चित्रपट पहिल्या शोच्या अगोदरच भारतमाता (परेल), वंदना (ठाणे), शाहू (कोल्हापूर) आदी थिएटरमध्ये हाऊसफुल झाला तर उमा (कांजूरमार्ग), मीनाक्षी (नागपूर) यासारख्या थिएटरमध्ये हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहे. सर्वच ठिकाणच्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने हा चित्रपट एक नवा इतिहास रचेल अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादाबद्दल निर्मात्या पूजा चव्हाण आणि प्रमोद चव्हाण यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.






























































