बंगळुरूचा विजयारंभ! उद्घाटनाच्या लढतीत हैदराबादचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवित आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १९व्या हंगामात विजयारंभ केला. चारशेहून अधिक धावांची लयलूट झालेल्या या लढतीत बंगळुरूने हैदराबादचा ६ फलंदाज आणि २६ चेंडू राखून पराभव करीत उद्घाटनाचा दिवस गाजविला. हैदराबादची आघाडीची फळी कापून काढणारा जेकब डफी या सामन्याचा मानकरी ठरला.

हैदराबादकडून मिळालेले २०२ धावांचे लक्ष्य बंगळुरूने १५.४ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात २०३ धावा करून सहज पूर्ण केले. फिल सॉल्ट (८) दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर स्टार खेळाडू विराट कोहलीने (नाबाद ६९) देवदत्त पडिक्कल (६१) व कर्णधार रजत पाटीदार (३१) यांना हाताशी धरून धावफलक नुसता पळवीत सहज विजयाला गवसणी घातली. विराटने ३८ चेंडूंत ५ षटकार व तितक्याच चौकारांसह आपली नाबाद ६९ धावांची खेळी सजविली. पडिक्कलने २६ चेंडूंत ६१ धावा फटकाविताना ७ चौकारांसह ४ षटकारांचा घणाघात केला. पाटीदारने १२ चेंडूंतील ३१ धावांच्या देखण्या खेळीत ३ टोलेजंग षटकार व २ सणसणीत चौकार लगावले. टीम डेव्हिड १६ धावांवर नाबाद राहिला. कोहलीने १६व्या षटकात ६,४,४,४ ठोकून बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. हैदराबादकडून डेव्हिड पेनने २, तर हर्ष दुबेने एक फलंदाज बाद केला.

जेकब डफीचा धमाका
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने सुरुवातीच्या पडझडीनंतरही ९ बाद २०१ धावांचा डोंगर उभारला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जेकब डफीने धमाका करीत हैदराबादची आघाडीची फळी कापून काढली. त्याने अभिषेक शर्मा (७), ट्रव्हिस हेड (११) व नितीश कुमार रेड्डी (१) यांना बाद करीत हैदराबादची ४.२ षटकांत ३ बाद २९ अशी दुर्दशा केली.

कर्णधार इशानचे धुमशान
मैदानावर आलेल्या कर्णधार इशान किशनने फलंदाजीची सूत्रे हाती घेत ८० धावांचे धुमशान घालत हैदराबादला संकटातून बाहेर काढले. त्याने हेन्रीक्स क्लासेनच्या (३१) साथीत चौथ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ९७ धावांची भागीदारी केली. किशनने ३८ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांचा घणाघात केला. क्लासेनने २२ चेंडूत २ चौकारांसह एक षटकार ठोकला. त्यानंतर अनिकेत वमनि १८ चेंडूंत ४ षटकार व ३ चौकारांसह ४३ धावांची वादळी खेळी केल्याने हैदराबादला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. बंगळुरूकडून जेकब डफी व रोमारिओ शेफर्ड यांनी ३-३ फलंदाज बाद केले, तर भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला