
सामना ऑनलाईन, नागपूर
आजघडीला आपल्या देशाचे कोणाशीही युद्ध सुरू नाही. तरीसुद्धा सीमेवर हिंदुस्थानी जवानांना रोजच शहीद व्हावे लागत आहे. केंद्रातील सरकार नीट काम करत नसल्यामुळेच हे घडत आहे, असा जोरदार हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारवर चढवला आहे. ते नागपूर येथे प्रहार समाज जागृती संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभात बोलत होते.
आपला देश ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात होता. त्यावेळी जनतेने लढून स्वातंत्र्य मिळवले. त्या लढय़ात अनेकांनी बलिदान दिले, रक्त सांडवले, मोठा त्याग केला. त्यानंतर देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी झालेल्या युद्धात जवानांनी हौतात्म्य पत्करले. कारण देशाची ती गरज होती, असे सांगून भागवत म्हणाले की, सीमेवर युद्ध सुरू नसतानाही आपले जवान शहीद होण्याचे खरे तर काहीच कारण नाही. पण हिंदुस्थानी जवानांना रोज बलिदान द्यावे लागत आहे. त्याचा अर्थ एवढाच की, केंद्रातील आपल्या सरकारचे काम नीट नाही, असे भागवत म्हणाले.






























































