संघ हा मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल नाही! सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रातील मोदी सरकारवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नियंत्रण असल्याचे चित्र मीडियामध्ये उभे केले जाते. हे पूर्णतः चुकीचे आहे. आमचे काही कार्यकर्ते नक्कीच सरकारचा भाग आहेत. मात्र संघ हा काही सरकारचा रिमोट कंट्रोल नाही. किंबहुना संघावरही सरकारचे नियंत्रण नाही, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी केले.

हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळामध्ये माजी सैनिकांना संबोधित करताना भागवत यांनी आरएसएसची भूमिका मांडली. सरकार आमच्या स्वयंसेवकांना कोणतेही आश्वासन देत नाही. सरकारकडून आम्हाला काय मिळाले, असे लोक विचारतात. त्यांना मी हे उत्तर देईन की, आपल्याकडे जे काही आहे ते आपल्याला गमवावेसुद्धा लागू शकते. यावेळी त्यांनी वैद्यकशास्त्रातील प्राचीन हिंदुस्थानी पद्धतींवरही प्रकाशझोत टाकला. काढा आपल्या पारंपरिक उपचाराचा भाग आहे. आज संपूर्ण जग हिंदुस्थानकडे पाहत आहे. जगाला आपल्याच मॉडेलचे अनुकरण करायचे आहे. भले हिंदुस्थान आज जागतिक महासत्ता नसला तरी कोरोना महामारीनंतरच्या काळात विश्वगुरू नक्कीच बनू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

सर्व हिंदुस्थानींचा डीएनए एकच!

सर्व हिंदुस्थानींचा डीएनए एकच असल्याचेही विधान सरसंघचालक भागवत यांनी केले आहे. 40 हजार वर्षांपूर्वीपासून हिंदुस्थानातील सर्व लोकांचा डीएनए आजच्या काळातील लोकांसारखाच आहे. आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. त्याच पूर्वजांच्या बलिदान आणि त्यागामुळे आपला देश भरभराटीला आला, आपली संस्कृती टिकून राहिली, असे ते म्हणाले.