रुपया घसरत नाही, डॉलर मजबूत होतोय! अर्थमंत्र्यांचे इकॉनॉमिक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक स्तरावर घडणाऱ्या विविध घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र रुपयाचे अवमूल्यन होत नसून डॉलर मजबूत होतोय असा दावा केला आहे. रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक प्रयत्न करत आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

अर्थमंत्री सीतारामन या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. वॉशिंग्टन येथे एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. रुपयाची सातत्याने पडझड होत असल्याने अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण गेल्या महिन्याच्या अखेरीस रुपयाचे मूल्य 84 पैशांनी घसरले होते. गेल्या सात महिन्यांतील हे सर्वात मोठे अवमूल्यन होते. त्याचसंदर्भात सीतारामन यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी, रुपया घसरला नसून इतर चलनांच्या तुलनेत हिंदुस्थानी चलनाने चांगली कामगिरी केली आहे असे सांगितले. दोनच दिवसांपूर्वी रुपयाचा दर 8 पैशांनी घसरला होता आणि डॉलरचा भाव 82.32 रुपये झाला होता. तत्पूर्वी गुरुवारी डॉलरचा दर 82.24 रुपये होता.

रुपयाचे अवमूल्यन होते तेव्हा देशाची प्रतिष्ठाही घसरते, सुप्रिया सुळे यांनी दिला सुषमा स्वराज यांचा दाखला

अर्थमंत्री सीतारामन यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या संसदेतील भाषणाचा दाखला दिला. त्या म्हणाल्या की, ‘पैसा हा केवळ कागदाचा तुकडा नाही तर देशाची प्रतिष्ठाही त्याच्याबरोबर जुळलेली असते. रुपयाचे अवमूल्यन होते तेव्हा देशाची प्रतिष्ठाही घसरत असते असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या.’ गेली अडीच वर्षे मी देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था या मुद्यांवर संसदेत सातत्याने बोलत आहे. त्याचे परिणाम आज तुम्हाला दिसत असतील असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.