
कोरोना लॉकडाऊनमुळे रशियात अडकून पडलेले 480 मराठी विद्यार्थी उद्या मायदेशी परतत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या पुढाकारामुळेच या विद्यार्थ्यांची घरवापसी होत आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात परतणाऱ्या या विद्यार्थ्यांपैकी 57 जण हे नुकतेच एमबीबीएस झाले असून इथे परतल्यानंतर ते कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणार आहेत.
रॉयल फ्लाईट बोईंग 777 हे चार्टर्ड विमान रशियाची राजधानी मॉस्को येथून या विद्यार्थ्यांना घेऊन उद्या पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे विद्यार्थी रशियामध्ये अडकून पडले होते. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रधान सचिव वलसा नायर-सिंग यांची भेट घेऊन या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आवश्यक परवानग्या व अन्य प्रक्रिया पूर्ण केली.
निक्सटूर या कंपनीच्या माध्यमातून रॉयल फ्लाईट्स रशिया आणि मॉस्कोतील हिंदुस्थानी दुतावासाशी यासंदर्भात संपर्क साधला गेला. विद्यार्थ्यांच्या परतीचा प्रवास त्यामुळे अत्यंत कमी खर्चात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी यासाठी राज्य सरकारचे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. भविष्यात रशियातील अन्य विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली जाईल असे कंपनीचे संचालक डॉ. निकेश रंजन यांनी सांगितले.





























































