रशियाचे यूक्रेनची राजधानी कीव्हमध्ये पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाच्या सैन्याने एकिकडे यूक्रेनच्या भूमीवर थैमान घातलेलं असताना दुसरीकडे यूक्रेनची राजधानी कीव्ह पुन्हा स्फोटांनी हादरलं आहे. रशियाने कीव्हवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, कीव्ह शहरातील इमारतींवर सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार 8 वाजून 15 मिनिटांनी हे हल्ले झाले. हल्ल्यानंतर काळ्या धुराचे लोट आकाशात जाताना दिसत होते. रशियाने यूक्रेनच्या दिशेने 12 आत्मघाती ड्रोन पाठवले. त्याखेरीज शेवचेंस्कीव्स्की जिल्ह्यातही क्षेपणास्त्र हल्ले केले गेले. हा जिल्हा राजधानी कीवच्या केंद्रस्थानी आहे.

अद्याप या हल्ल्यात झालेल्या जीवित आणि वित्तहानीविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. यूक्रेनने केलेल्या दाव्यानुसार, रशिया हल्ल्यांची संख्या तर वाढवत आहेच पण स्फोट देखील जास्त मोठे आणि घातक असतील याची विशेष काळजी घेत आहे. क्षेपणास्त्रांसोबत आणखी उत्पात माजवण्यासाठी रशियाने ड्रोनही पाठवले आहेत.

या ड्रोनच्या माध्यमातून सहा स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. त्यामुळे यूक्रेनच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.