
जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यापासून आकांडतांडव करणाऱ्या पाकिस्तानला हिंदुस्थानने अमेरिकेच्या भूमीवरून चांगलेच धुतले आहे. हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एक. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना त्यांच्या देशातून दहशतवाद संपवण्याचे आवाहन केले आहे. हिंदुस्थानला पाकिस्तानशी नाही तर ‘टेररिस्तान’शी चर्चा करण्यास अडचण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
तुम्हाला असे पत्रकार कुठे भेटतात? कश्मीर प्रश्नावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा इम्रान खान यांना खोचक प्रश्न
न्यू यॉर्कमध्ये ‘एशिया सोसायटी’मध्ये बोलताना एस जयशंकर यांनी पाकिस्तान आणि इम्रान खान यांचा समाचार घेतला. ‘जम्मू-कश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानसोबत राजकीय संबंध कमी केले आणि हिंदुस्थानच्या राजदुतालाही माघारी पाठवले. कश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानने दहशतवादी संघटानांना जन्म दिला’, असे एस जयशंकर म्हणाले.
स्वत:च्या हद्दीतील सुधारणा
कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर बोलताना एस जयशंकर यांनी हा संपूर्णत: हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगितले. यामुळे इतर देशांच्या सीमांवर कोणताही प्रभाव पडणार नाही. आमच्या देशाच्या हद्दीत केलेली ही सुधारणा आहे. यावर पाकिस्तान आणि चीनने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. पाकिस्तान असा देश आहे की कश्मीर मुद्द्यावरून त्यांनी दहशतवादाला जन्म दिला, दहशतवादी संघटना निर्माण केल्या. दहशतवाद हा कश्मीरपेक्षाही मोठा मुद्दा आहे आणि तो त्यांनी हिंदुस्थानमध्ये दहशत माजवण्यासाठी निर्माण केला, असेही एस जयशंकर ठासून म्हणाले.
इम्रान यांचे ट्रम्पपुढे लोटांगण
अमेरिकेमध्ये इम्रान खान यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान पुन्हा कश्मीर राग आळवला. कश्मीरमध्ये मानवाधिकांचे उल्लंघन होत असून येथून कर्फ्यू हटवल्याशिवाय हिंदुस्थानशी चर्चा करणार नाही, असा सूर त्यांनी लावला होता. ट्रम्प भेटीदरम्यानही त्यांनी हा मुद्दा उचलला. यावेळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी कश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी इम्रान यांना ‘असले’ पत्रकार तुम्हा कुठून आणता असे म्हणत सर्वासमोर तुडवले होते.


























































