
उद्यमशील व प्रगत राज्य ही कधीकाळी महाराष्ट्राची ओळख होती. पण हे ‘भूषण’ पुसून कर्जबाजारी व शेतकरी आत्महत्यांचे राज्य असे ‘दूषण’ आज महाराष्ट्राला मिळत असेल तर ते वाईट आहे. ‘राकट देशा, कणखर देशा…’ असे महाराष्ट्राचे वर्णन आपण महाराष्ट्र गीतामध्ये वाचतो. पण हा गौरव केवळ कवितेपुरता मर्यादित असून चालणार नाही. दिल्लीपुढे शेपूट घालणाऱ्यांनी हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्री कमजोर केला आहे. पूर्वीचा तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय? शेतकऱ्यांच्या घामातून व 107 हुतात्म्यांच्या रक्तातून दिमाखात उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवायचा तर मराठी जनतेला पुन्हा एकदा लढावेच लागेल. महाराष्ट्रधर्म जागवावाच लागेल!
देशावर युद्धाचे सावट आले असतानाच आज 65व्या महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा होत आहे. देशावर कोणतेही संकट आले आणि त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र धावला नाही असे कधी घडले नाही. पण तो कणखर, बाणेदार महाराष्ट्र आज कुठे दिसतो आहे काय? अर्थात आजही काहीजणांना स्वतः सह्याद्री असल्याचा साक्षात्कार होतो. हिमालयाच्या मदतीस निघाल्याचा आव ते आणतात खरा, पण प्रत्यक्षात ते दिल्लीपुढे झुकण्यासाठीच तेथे पोहोचतात. दिल्लीच्या वाटेवरचे ‘पाय-पुसणे’ अशीच अवस्था त्यांनी महाराष्ट्राची करून ठेवली आहे. हे या मऱ्हाटी राज्याचे दुर्दैवच म्हणायला हवे. पहलगामच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना कश्मीरमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्या पक्षांमध्ये जुंपलेली श्रेयवादाची लाजीरवाणी लढाई उभ्या महाराष्ट्राने पाहिली. पुन्हा जणूकाही आपल्याच खिशातून खर्च करून पर्यटकांना परत आणतोय, असा नकली आव काहींनी आणला. मात्र पर्यटकांना सरकारी खर्चानेच परत आणल्याचा भंडाफोड झाला आणि फुकाच्या गप्पा ठोकणाऱ्यांची तोंडे बंद झाली. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटक मृत्युमुखी पडले. त्यामुळे अवघा महाराष्ट्र व देश शोकाकुल असताना महाराष्ट्रात सरकारमध्येच श्रेयासाठी झालेली धडपड म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच होता. आज मराठी मुलुखात महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा होत असताना या सोहळ्यात खऱ्या अर्थाने महाराष्ट्रधर्माचा गजर व जागर व्हायला हवा. पण या राज्यात महाराष्ट्रधर्माचे खरोखरच पालन होत आहे काय, हा प्रश्न महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आपल्या मनास विचारायला हवा. अर्थात महाराष्ट्रधर्म निस्तेज करण्यासाठी ज्यांनी कटकारस्थानं रचली, विश्वासघात केला आणि दिल्लीश्वरांच्या पायावर महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला, त्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवण्यात तरी काय हशील? मुळात
महाराष्ट्रधर्म म्हणजे काय
हेच ही मंडळी दिल्लीच्या नादी लागून विसरली आहे. महाराष्ट्रधर्मापेक्षा सत्ता, पदे व खुर्च्या यांना मानाचे स्थान मिळाल्यावर दुसरे काय होणार? गद्दारी, बेइमानी व खाल्ल्या ताटात माती कालवणाऱ्या बेइमानीच्या विकृतीला महाराष्ट्रधर्मात कधीच स्थान नव्हते. पण अलीकडे ‘गद्दारी’ व ‘खोके’ यांसारख्या शब्दांनाच जिथे महाराष्ट्रात राजमान्यता मिळाली तिथे महाराष्ट्रधर्माचे गोडवे कुणी गायचे? महाराष्ट्रधर्माशी बेइमानी करून याच राज्यातील काही लोक दिल्लीचे मिंधे झाले. या घरभेद्यांनी आधी दिल्लीच्या इशाऱ्यावर फंदफितुरी केली व महाराष्ट्राला आणि मराठी जनतेच्या विश्वासाला धोका दिला. त्यानंतर मराठी जनतेचा प्रामाणिक कौल व महाराष्ट्राचे जनमत झुगारून कृत्रिम बहुमताच्या जोरावर दिल्लीच्या तालावर नाचणारे व जनतेला नको असणारे कृत्रिम सरकार महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लावलेली ती चूडच होती. हा महाराष्ट्रद्रोहच होता व त्याचे विस्मरण मऱ्हाटी जनतेने कदापि होऊ देऊ नये. किंबहुना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्या गद्दारांचा व त्यांचा वापर करून घेणाऱ्या दिल्लीश्वरांचा हिशेब कसा चुकता करायचा याचा संकल्प मराठी जनतेने सोडायला हवा. तोच महाराष्ट्रधर्म आहे! बरे, बेइमानी करून जी सत्ता मिळवली ती तरी ही मंडळी जनतेच्या कल्याणासाठी वापरत आहे काय? तर तेही नाही. निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना दरमहा 1500 रुपये यांनी देऊ केले. ‘आम्हाला पुन्हा निवडून दिले, तर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ’ असे आश्वासन देऊन तेच राज्यकर्ते पुन्हा सत्तेवर आले. मात्र, 2100 तर सोडा ही रक्कम 500 रुपयांवर आणण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. शिवाय निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या संख्येतही मोठी कपात करण्यात आली. ‘गरज सरो आणि मतदार मरो’ असाच हा प्रकार आहे. भामटय़ा भावांनी बहिणींशी केलेला हा द्रोह आहे. महाराष्ट्रधर्मात या द्रोहाला स्थान नाही. छत्रपती शिवरायांनी ज्या औरंगजेबाशी आयुष्यभर लढा दिला व
त्याचे थडगे
शेवटी महाराष्ट्रातच बांधावे लागले त्या औरंगजेबाची कबर खोदून छत्रपती शिवरायांचा व मराठ्यांच्या शौर्याचा इतिहासच मिटवून टाकण्याचे प्रयत्न अलीकडे महाराष्ट्रात झाले. औरंगजेबाला गाडले ते ठिकाण म्हणजे शिवरायांच्या शौर्याचे प्रतीकच. पण सत्तेतील महाराष्ट्रद्रोह्यांनी शिवरायांचा हा इतिहासच कबरीच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला. हीदेखील महाराष्ट्रधर्माशी केलेली प्रतारणाच होती. महाराष्ट्रधर्माचा विसर पडलेल्या याच मंडळींनी मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्याचे तुघलकी फर्मान सोडले. मराठी जनतेचा संताप व रेट्यामुळे हा निर्णय आता मागे घेण्यात आला असला तरी मराठीविषयी असलेला राज्यकर्त्यांचा आकसच यातून समोर आला. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेत असताना, महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास हिरावून घेतला जात असताना दिल्ली व गुजरातपुढे शेपटा घालणारे स्वाभिमानशून्य राज्यकर्ते आज महाराष्ट्राच्या सत्तेवर बसले आहेत. भ्रष्टाचार आणि ‘खोके’संस्कृतीमुळे महाराष्ट्राच्या डोक्यावर आज साडेनऊ लाख कोटींचे कर्ज झाले आहे. शेतकऱ्यांना तर कुणी वालीच उरला नाही. गेल्या वर्षभरात 2700 हून अधिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. उद्यमशील व प्रगत राज्य ही कधीकाळी महाराष्ट्राची ओळख होती. पण हे ‘भूषण’ पुसून कर्जबाजारी व शेतकरी आत्महत्यांचे राज्य असे ‘दूषण’ आज महाराष्ट्राला मिळत असेल तर ते वाईट आहे. ‘राकट देशा, कणखर देशा…’ असे महाराष्ट्राचे वर्णन आपण महाराष्ट्र गीतामध्ये वाचतो. पण हा गौरव केवळ कवितेपुरता मर्यादित असून चालणार नाही. दिल्लीपुढे शेपूट घालणाऱ्यांनी हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्री कमजोर केला आहे. पूर्वीचा तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय? शेतकऱ्यांच्या घामातून व 107 हुतात्म्यांच्या रक्तातून दिमाखात उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवायचा तर मराठी जनतेला पुन्हा एकदा लढावेच लागेल. महाराष्ट्रधर्म जागवावाच लागेल!