सामना अग्रलेख – होय, युती झाली आहे!

6118

गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील कारभार यशस्वीपणे हाकणारी युती एका बाजूला आणि फाटकेतुटके, गर्भगळित विरोधक दुसऱ्या बाजूला हे आजचे चित्र आहे. ‘युती दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीवर अखेर मोहोर उठली आहे. दोन्ही बाजूच्या जबाबदार नेत्यांच्या सही-शिक्क्याने संयुक्त पत्रक निघाले. तरीही प्रश्न विचारला जातोच की, ‘युती’ची अधिकृत घोषणा कधी होणार? नक्की जागांचे वाटप कसे झाले? प्रश्नही तुम्हीच विचारायचे आणि उत्तरेही तुम्हीच तयार करून ठेवायची. त्यानुसार ‘मीडिया’ने जागावाटपाचा आकडाही जाहीर करून टाकला आहे. युती म्हटली की, देवाण-घेवाण व्हायचीच. यावेळी शिवसेनेच्या बाबतीत घेवाण कमी व देवाण जास्त झाली हे मान्य करावेच लागेल, पण घेवाणीत जे आले त्यात शंभर टक्के यश मिळवायचेच असा आमचा निर्धार आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर मोठा पक्ष बनला आहे. अनेक पक्षांतले प्रमुख लोक महाराष्ट्रात त्यांच्या ओसरीवर बसले आहेत. त्यांचा यथायोग्य पाहुणचार करायचा म्हटल्यावर त्यांना मोठा घास लागणार व आम्ही तो मोठय़ा मनाने मान्य केला आहे. यास सिंहाचा वाटा म्हणायचे की आणखी काही हे ज्याचे त्याने ठरवायचे, पण भाजपच्या पदरात ‘मित्रपक्ष’ नामक दत्तक विधानेही जास्त आहेत, त्यांनाही वाटा द्यावा लागेल अशी एकंदरीत

गोळाबेरीज

झाली व त्यात शिवसेनेने सवाशेच्या आसपास जागा लढवण्याचे ठरवले. तयारी तशी 288 मतदारसंघांचीच होती. शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण होतेच. चि. आदित्यच्या ‘जनआशीर्वाद यात्रे’ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनआशीर्वाद मिळवला व त्याच आशीर्वादाच्या बळावर आदित्यही वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. शिवसेनेची निर्मिती व गेल्या पन्नास वर्षांची वाटचाल हाच एक जनआशीर्वाद आहे. या आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही अनेक संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभे राहिलो आहोत. शिवसेनेच्या वाटेवर आतापर्यंत अनेक मांजरे आडवी गेली, अनेकांनी खड्डे खणले व काटे पेरले. त्या सगळय़ांना पुरून उरलेली ही शिवसेना आहे याचे भान शिवसेनेच्या बाबतीत वेडीवाकडी स्वप्ने पाहणाऱयांनी ठेवले तर ते त्यांच्या आरोग्यासाठी बरे ठरेल. महाराष्ट्रावर शिवसेनेचा पगडा आहे आणि राहील. निवडणुकांचे दौलतजादा छाप राजकारण ज्या जोमाने राबवले जात आहे त्याचा डाग आम्ही शिवरायांच्या भगव्यास कदापि लागू देणार नाही. भगव्याचे तेज आणि पावित्र्य कायम राखूनच आम्ही सर्वकाही घडवत आहोत. राजकारणात

चढउतार

येत असतात. वाऱ्यासोबत वाहत जाणाऱ्या पाखरांप्रमाणे आम्ही नव्हतं. शिवसेनेचा गरुड आकाशात झेपावणारा व गवसणी घालणारा आहे. त्यात आता ‘युती’ची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्राच्या रणात इतरांनीही शड्डू ठोकले आहेत, पण शेवटी पिचक्या मांडीवर थापा मारून काय होणार? काँगेस आघाडीचे सूत जुळले असले तरी ते सूत वळेल काय? हा प्रश्न आहेच. कालपर्यंत यार्डात उभ्या असलेल्या इंजिनासही धक्के देण्याचे काम सुरू आहे. वंचित आघाडीचे आणि एमआयएमचे इतके फाटले आहे की, ते शिवायचे की तसेच फाटलेले ठेवून बोहारणीस द्यावयाचे ते आता जनतेनेच ठरवायचे आहे. गेली पाच वर्षे महाराष्ट्रातील कारभार यशस्वीपणे हाकणारी युती एका बाजूला आणि फाटके-तुटके, गर्भगळित विरोधक दुसऱ्या बाजूला हे आजचे चित्र आहे. ‘युती’त दोन पक्षांची जास्तीत जास्त मुद्दय़ांवर सहमती आहे. तसे विरोधकांच्या बाबतीत सांगता येईल काय? रिंगणात उतरणे सोपे असते, पण रिंगणात टिकणे अवघड असते. आता मैदानही आमचे, रिंगणही आमचे व रिंगणात धावणारे विजयी अश्वही आमचे. युती झाली आहे, विजय पक्का आहे!

आपली प्रतिक्रिया द्या