सामना अग्रलेख – विजयाचा सिंहनाद!

2687

सत्ताम्हणजेच सर्वस्व अशा वातावरणात निवडणुका होत आहेत सत्तेसाठी कोणत्याही थराला जायची राजकीय मंडळींची तयारी आहे. पांडवांनी शमीच्या झाडावरील शस्त्र काढली ती धर्म सत्य यांच्या विजयासाठी. आज शस्त्र उचलली जातात ती पाठीत वार करण्यासाठीच. असे असंख्य घाव झेलून शिवसेना उभी आहे. पुढे जात राहील. नव्या युद्धाचा सिंहनाद झाला आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेला आशीर्वाद देईलच देईल. आपट्याची पाने आज वाटू, पण खरे सोने दिवाळीच्या आधी, 24 तारखेस लुटू. आजच्या मुहूर्तावर विजयाची सुरुवात करूया!

दसऱयाचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस. दिवाळी, दसरा आणि हातपाय पसरा ही समजूत आतापर्यंत कशी तरी टिकली, परंतु याच्यापुढे ती टिकणे सोपे नाही. कारण आता आमच्या आयुष्यात जे सणवार येतात ते आपल्याबरोबर आनंद घेऊन येतातच असे नाही. उलट सध्याच्या आर्थिक मंदी आणि बजबजपुरीच्या काळात नको ते सण आणि उत्सव असे लोकांना झाले आहे. तरीही एक शुभदिवस म्हणून आमच्या जीवनात विजयादशमीचे महत्त्व आहे. या दिवशी आपट्याच्या पानांनाही सोन्याचे महत्त्व येते व पांडवांनी शमीच्या झाडावरील शस्त्र काढली म्हणून आपणही शस्त्रपूजा वगैरे करत असतो. या परंपरा पाळत धर्म पुढे चालला आहे. महाभारत हे तसे राजकारणच होते. तेथेही गटबाज्या उफाळल्या, पक्षांतरे उसळली. योद्धे तटस्थ राहिले. कट-कारस्थाने झाली. शेवटी ते धर्मयुद्ध म्हणून मान्य केल्यावर त्या महाभारताचा प्रभाव आपल्या राजकारणावर पडला नाही तर नवलच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात विधानसभेचे महाभारत सुरू झाले आहे व जे कृष्ण-अर्जुनाच्या महाभारतात घडले तेच प्रकार ‘पात्र’ बदलून या युगात घडत आहेत. पांडवांचे राज्य कौरवांनी घेतले होते. ते परत मिळविण्यासाठी सामोपचाराचे सर्व उपाय व्यर्थ ठरले आणि अखेरीस लढाईची वेळ आली. भीष्माचार्यांनी सिंहनाद केला. इकडे भीमाने आपला पौंड्र नामक महाशंख वाजविला. त्याच्या मागोमाग सर्व योद्धय़ांनी आपापले भयंकर शंख वाजवले. नगारे आणि नौबती यांच्या कर्णभैरव गर्जना होऊ लागल्या. जिकडे तिकडे तुमूल रणवाद्यांची एकच गर्दी उसळून गेली. भयंकर

प्रतिध्वनी

उठू लागले. त्या भयंकर निनादामुळे समुद्राचे पाणी वर उसळले, मेरू डळमळू लागले आणि झाडांवरील फुलांप्रमाणे आकाशातील नक्षत्रे खाली गळून पडली. अशी अटीतटीची लढाई सुरू झाली. तेव्हा अर्जुनाच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनाच्या रथाचे घोडे श्रीकृष्णाने कौरवांच्या सेनेकडे वळवले. अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी येऊन उभा राहिला. अर्जुनाने आपली नजर कौरव सैन्याकडे फेकली आणि त्या सैन्याच्या आघाडीवर असलेले आपलेच ‘आप्त’ पाहून तो योद्धा डचमळला आणि हे महाशय नातीगोती, धर्मशास्त्राचा कीस पाडीत रणमैदानावर बसले. खरे म्हणजे ज्याच्या अंगात शौर्य आहे त्याने धर्माची चिकित्सा करीत बसू नये.

‘‘नकांक्षे विजय कृष्ण नच राज्यं सुखानिच।

किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीविजेन वा।।

हे पळपुटेपणाचे उद्गार अर्जुनाच्या तोंडून निघाले, तसे आज कोणत्याही ‘आयाराम – गयारामां’च्या किंवा पुढाऱयांच्या तोंडून निघायचे नाहीत. ‘‘आम्हाला राज्य घेऊन काय करावयाचे आहे? (किं नो राज्येन)’’ अशा शब्दांनी आपली जीभ विटाळून टाकण्याइतका एक तरी मूर्ख योद्धा आज पृथ्वीच्या पाठीवर आढळेल काय? अजिबात नाही. निवडणुका हे एक महाभारत युद्धच झाले आहे. राज्य आणि सत्ता मिळविण्यासाठी फासे फेकले जात आहेत. महाराष्ट्राच्या या महाभारतात शिवसेना एखाद्या योद्धय़ाप्रमाणेच उतरली आहे. आम्हाला सत्ता हवी आहे, कारण महाराष्ट्र राज्यावर भगवी पताका फडकवून

शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न

साकार करायचे आहे. आम्हाला राज्य हवे ते भोगण्यासाठी नाही तर शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, शिक्षक, अबालवृद्ध यांना चांगले दिवस दाखविण्यासाठी. आज महाराष्ट्रात एक प्रकारची घुसमट सुरू आहे. पक्षांतराची सूज वाढली हे खरे, पण त्या बिभीषणांमुळे राज्याला बाळसे धरेलच असे नाही. प्रश्न अफाट आहेत आणि योजना अमलात आणणारे पुचाट आहेत. ज्या बेदरकारपणे ‘आरे’ची जंगले तोडली जातात तो बेदरकारपणा लोकांचे प्रश्न सोडविण्यात दाखवला जाईल त्यावेळी राज्यास एक प्रकारची मजबुती येईल. महाराष्ट्र शिवरायांचा आहे याची आठवण वारंवार करून दिली जाते, पण शिवरायांच्या अंगचा कोणता गुण आम्ही घेतला आहे? दुसरे शिवछत्रपती होणे नाही, पण त्यांनी रयतेसाठी व स्वराज्यासाठी ज्या अनेक चांगल्या गोष्टी केल्या त्यातील कणभर जरी आम्ही करू शकलो तरी शिवरायांचे हे राज्य दोन पावले पुढे जाईल. ‘सत्ता’ म्हणजेच सर्वस्व अशा वातावरणात निवडणुका होत आहेत व सत्तेसाठी कोणत्याही थराला जायची राजकीय मंडळींची तयारी आहे. पांडवांनी शमीच्या झाडावरील शस्त्र काढली ती धर्म व सत्य यांच्या विजयासाठी. आज शस्त्र उचलली जातात ती पाठीत वार करण्यासाठीच. असे असंख्य घाव झेलून शिवसेना उभी आहे. पुढे जात राहील. नव्या युद्धाचा सिंहनाद झाला आहे. महाराष्ट्राची जनता शिवसेनेला आशीर्वाद देईलच देईल. आपट्याची पाने आज वाटू, पण खरे सोने दिवाळीच्या आधी, 24 तारखेस लुटू. आजच्या मुहूर्तावर विजयाची सुरुवात करूया!

आपली प्रतिक्रिया द्या