
रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले सभापती जेव्हा आपल्या दालनात गेले तेव्हा त्या दालनातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने सभापती “घामाघूम” झाल्याचे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध करताच जिल्हापरिषद प्रशासन जागे झाले. तात्काळ तीन सभापतींच्या दालनात नवीन “एसी” लावण्यात आल्याने आता वातावरण “कुल कुल थंडा थंडा” झाले आहे.
जिल्हा परिषद सभापती पदाची निवडणूक होणार आहे हे माहीत असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाने सभापती दालनाच्या देखभाल दुरूस्तीकडे लक्ष दिले नाही.त्यामुळे पदग्रहण करण्यासाठी दालनात आलेल्या शिक्षण सभापती, समाजकल्याण सभापती आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतींना घाम पुसत शुभेच्छा स्वीकाराव्या लागल्या होत्या.
शुभेच्छा देण्यासाठी आलेले ग्रामस्थही उकाड्याने हैराण झाले होते. त्यानंतर दैनिक सामनाने “बिनविरोध झालेले सभापती घामाघूम” हे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाचे धाबे दणाणले. समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर आणि शिक्षण सभापती नंदकुमार मूरकर यांच्या दालनात प्रत्येकी एक एसी बसविण्यात आला आहे.
शिक्षण समितीच्या दालनात दुरूस्ती
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण सभापतींच्या दालनात एक एसी बसविण्यात आला आहे. त्याचबरोबर दिवे बदलण्याचे कामही आज सायंकाळी सुरू झाले होते.


























































