शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी ‘सामना वाचन प्रेरणा दिवस’, महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचा उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारी रोजी साजरी होणारी जयंती ‘सामना वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरी होणार आहे. मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

आजच्या तरुण पिढीने शिवसेनाप्रमुखांपासून वाचनाची प्रेरणा घेऊन वाचन हा छंद म्हणून जोपासावा हा या उपक्रमामागचा हेतू असल्याचे महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या सल्लागार शिल्पा सरपोतदार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. हा उपक्रम पहिल्यांदाच होत असल्याने राज्यातील 12 जिह्यांत हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमात सार्वजनिक ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.

संभाजीनगरमधील फुलंब्री येथे, जळगावातील धरणगावमध्ये, धुळे येथील महानंदा महाविद्यालय, टिळक स्मारक, यवतमाळ, अमरावतीतील दर्यापूर, नांदेड जिह्यातील भोकर येथे, लातूरमधील उदगीर, सोलापूर जिह्यात पंढरपूर, शिरोळ कोल्हापूर, फलटण, सातारा तसेच बीड येथे हा उपक्रम होणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी सुरू केलेली मराठी वाचन संस्पृती पुढे नेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन बी. जी. देशमुख, विजय पोकळे, रवींद्र धुमाळ, संजय मोटे, विष्णू जगताप, नीळपंठ टापरे, शेख अन्सर, संजय कोल्हे, महंत प्रभाकर कपाटे, दिलीप पाटील, बापूसाहेब जाधव, विकास भोसले यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या