
देवबाग येथे समुद्रकिनारी मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने सुटका करत त्याला जीवदान दिले. कासवाला सुखरुप समुद्रात सोडण्यात आले आहे. देवबागमधील विठ्ठल मंदिर येथील मच्छीमार रोमी ब्रिटो सहकाऱ्यांसोबत रात्री समुद्रकिनारी फेरफटका मारत असताना त्यांना एक कासव त्यांना जाळ्यात अडकलेल्या स्थितीत आढळले. मात्र, त्याची सुटका करणे जोखमीचे असल्याने त्यांनी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फॉर्म सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना मदतीसाठी बोलावले.
कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फॉर्म सिंधुदुर्गचे सदस्य संजयकुमार कुपकर, आनंद बांबर्डेकर, नाना तांडेल हे घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या या कासवाला सुरक्षितपणे जाळ्यातून बाहेर काढले. त्यानंतर या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याचठिकाणी तुषार गावकर व प्रमोद गावकर यांना कासवाची अंडी आढळून आली होती. त्यांनी वनविभागाच्या मदतीने अंडी सुरक्षित केली होती. मालवणच्या किनारपट्टीवर स्थानिक मच्छीमार व नागरिक दाखवत असलेली जागरूकता समुद्री जीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची ठरत आहे.





























































