
सामना प्रतिनिधी । शिर्डी
नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त शिर्डीच्या श्री साईबाबांचे दर्शन घेणार्या भक्तांनी साईचरणी तब्बल 14 कोटी 54 लाखांचे दान अर्पण केले आहे. 22 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान साडेनऊ लाख भक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे.
श्री साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार साईचरणी भक्तांनी रोख रुपये, सोने-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. दानपेटीत 8.5 कोटींची रोकड, ऑनलाइन, चेक, डीडीद्वारे 6 कोटी रुपये, 19 लाखांच्या सोने-चांदीच्या वस्तू तसेच 64 लाखांचे विदेशी चलन साईंचरणी अर्पण करण्यात आले आहेत.
विदेशातील 19 देशांमधील भक्तांनीही साईबाबा मंदिरात दान केले आहे. यात अमेरिका, इंग्लंड, मलेशिया, सिंगापूर, जापान आणि चीन या देशांमधील भक्तांचा समावेश आहे. तसेच लाडू विक्रीतून दीड कोटी रुपये आणि मंदिर ट्रस्टने दर्शन पास आणि ऑनलाइन नोंदणीद्वारे 3.62 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
























































