
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल स्पर्धेत यवतमाळच्या साक्षी बुरकुलेने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून दिवस गाजविला. वेटलिफ्टिंगच्या ८६ किलो गटात सर्वाधिक एकूण १५० किलो वजन पेलून साक्षी बुरकुलेने पर्दापणातच सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला.
खेलो इंडिया ट्रायबल गेम्स २०२६ चा भाग म्हणून छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित महिलांच्या ८६ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोमांचक लढती पाहायला मिळाल्या. पंडित रविशंकर शुक्ल विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या साक्षी बांदू बुरकुलेने सुवर्णपदक, तर छत्तीसगडच्या ऋषिका कश्यपने रौप्य आणि आसामच्या बिटुपुना देवरीने कांस्यपदक पटकावले आहे.
स्नॅच प्रकारातील तिसऱ्या प्रयत्नात साक्षीने ६८ किलो तर क्लिन ॲन्ड जर्क प्रकारात ८२ किलो वजनाची कामगिरी करीत अव्वल स्थान पटकावले. यजमान छत्तीसगडच्या रूषिका कश्यपने १२१ किलोसह रौप्य पदक जिंकले. ११८ किलो वजनाची कामगिरी करणाऱ्या आसामच्या बितूपूर्णाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
























































