एसटीच्या प्रशासकीय कर्मचारी, अधिकार्‍यांचे रखडलेले वेतन मिळाले; बोनस किती आणि कधी मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाच्या प्रशासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांचे वेतन बुधवारी अखेर झाले. एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या मदतीशिवाय कर्मचार्‍यांचे वेतनही अदा करणे अवघड बनले आहे. मात्र हे वेतन महामंडळाच्या अंतर्गत निधीतून देण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना बोनस किती आणि कधी मिळणार असा पेच निर्माण झाला आहे.

एसटी महामंडळाच्या राज्यातील सुमारे 10 हजार प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांचा ऐन दिवाळीच्या तोंडावर सप्टेंबरचा पगार रखडल्याने त्यांची कोंडी झाली होती. एसटीच्या कर्मचार्‍यांचे वेतन देण्यासाठी महिन्याला 360 कोटी रूपये लागतात. मात्र, गेल्या तीन महिन्यात दर महिन्याला 360 कोटी रुपयांऐवजी 100 कोटी रुपये राज्य सरकारने दिल्याने महामंडळाचे गणित बिघडले.

एसटीचे सुमारे राज्यभरात सुमारे एक लाख कर्मचारी असून त्यांना दर महिन्याच्या सात तारखेला वेतन मिळते. चालक, वाहक तसेच यांत्रिकी कर्मचार्‍यांचे वेतन परवा मिळाले. मात्र प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍याचे वेतन न मिळाल्याने रोष व्यक्त होत होता. अखेर बुधवारी त्यांचे महामंडळाच्या अंतर्गत निधीतून वेतन देण्यात आले. सध्या एसटीचे रोजचे उत्पन्न 12 कोटी रूपये इतके रसातळाला गेले आहे. लॉकडाऊनपूर्वी एसटीचे रोजचे उत्पन्न 22 कोटी रूपये झाले होते. सध्या एसटीला डिझेल भरायलाही पैसे नाही अशी वाईट अवस्था झाली आहे. सध्या एसटीला पाच हजार कोटीच्या तातडीच्या मदतीची गरज आहे, तरच महामंडळाचा डोलारा सावरेल अशी स्थिती आहे.