
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला बायोमेट्रिक हजेरीचा घोळ सुरूच असून या महिन्यातही हजारो कर्मचार्यांचा 10 ते 20 हजारांपर्यंत पगार कापण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराचा निषेध करीत आज ‘डी’ वॉर्डमध्ये ‘काम बंद’ आंदोलन करण्यात आले. शिवाय विभाग कार्यालयावर धडक देऊन अधिकार्यांना जाब विचारण्यात आला.
पालिका कर्मचार्यांची हजेरी आता बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जात आहे, मात्र या पद्धतीने कामावर आलेले कर्मचारी हजेरी लावत असले तरी या हजेरीची नोंद अनेक वेळा योग्य प्रकारे पालिकेच्या ‘सॅप’ प्रणालीत होत नसल्याचे समोर आले आहे. अनेक वेळा ‘थंब’ करायची मशीन बंद तर कधी योग्य नोंद होत नसल्याच्या तक्रारी कर्मचारी करीत आहेत. गेल्या महिन्यातही हजारो कर्मचार्यांचा पगार कापला गेल्याचे तर काही कर्मचार्यांना शून्य पगार आल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे सर्व कर्मचारी संघटना बायोमेट्रिक पद्धत हजेरीशी जोडू नये अशी मागणी करीत आहेत, मात्र अद्याप पालिकेने याची दखल घेतलेली नाही असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे प्रवीण मांजलकर यांनी सांगितले.
…तर सर्व विभागात ‘काम बंद’ आंदोलन
पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन बायोमेट्रिक हजेरी प्रकारातील त्रुटी दूर का करीत नाही, असा सवाल समन्वय समितीचे बाबा कदम यांनी केला. याबाबत आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही म्हणाले. दरम्यान, ‘डी’ विभागातील सफाई कामगारांचा पगार कापल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. त्यामुळे पालिकेने जर दोन दिवसांत कर्मचार्यांचा पगार खात्यावर जमा केला नाही तर सर्व 24 वॉर्डमध्ये काम बंद आंदोलन करू असा इशाराही म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे.
























































