मीठ – किती ते प्रकार!

>> मंगल गोगटे

मीठ हे जगात सर्वसाधारणपणे मिळणारं खनिज आहे आणि म्हणूनच ते कधी कमी पडण्याची शक्यता नाही. खाणीतून मिळविलेल्या वा समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनापासून मिळवलेल्या तसेच वेगवेगळ्या स्रोतांतून मिळालेल्या मिठांच्या चवीत सूक्ष्म फरक असतो. कधी कधी मिठात काहीतरी मिसळलेलं असतं, ज्यामुळे त्याची चव आणि रंग बदलते.

आपल्यापैकी कितीतरी जणांच्या घरी लहानपणी मीठ आणलं जायचं ते एकाच प्रकारचं असायचं. मिठागरांतून तयार झालेलं मीठ घरात आलं की, वापरण्याआधी ते कुटून वा वाटून घ्यावं लागायचं. सगळीकडे एकच चव. आता मात्र वेगळ्या घरी वेगळी चव. कुठे जास्त खारट मीठ तर कुठे कमी खारट, पण असं झालं कसं?

मीठ हे पदार्थाला चव आणण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. पुराणात जेवणात मीठ न वाढून कृष्णाने रुक्मिणीला मिठाचं महत्त्व दाखवून दिलं होतं आणि आता ‘हेल्दी फूड’च्या नावाखाली असलेल्या मिठाचे अनेक प्रकार दाखवून देत त्याचे फायदे– तोटे (अनेकदा फक्त मार्केटिंगच्या दृष्टीने) त्या त्या कंपन्या सांगत असतात.

आपल्या बऱयाच अन्नपदार्थांत मीठ असतंच, जे सोडियम आणि क्लोराईड यांनी तयार झालं आहे आणि या दोन्हीची गरज आपल्या शरीराला आहे – त्याची वेगवेगळी कामं उरकण्यासाठी. सोडियम आणि क्लोरिन यांचा उपयोग मेंदूमधे पाण्याचा योग्य समतोल राखण्यासाठी होतो. तसंच मेंदू व नसा यांना इलेक्ट्रिकल प्रेरणांमुळे एकमेकांशी संवाद साधणे शक्य होते. याशिवाय ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यास आणि स्नायूतील पेटके थांबवण्यासाठी उपयोगी आहे. अन्न टिकवण्यासाठीही मिठाचा उपयोग केला जातो.

मिठाचे वेगवेगळे प्रकार असतात जे स्वयंपाकासाठी, लोणचं बनवण्यासाठी, चमकदार करण्यासाठी आणि अन्न टिकवण्यासाठी वापरले जातात. जगात उपलब्ध असलेले मीठ सारख्याच प्रमाणात घेतलं तरी त्यामुळे पदार्थांना सारखाच खारटपणा येत नाही वा सारखीच चवही येत नाही ही गोष्ट स्वयंपाक करणाऱयाला माहिती असणं जरुरी आहे. जसं की, तीच चव आणण्यासाठी कोशर सॉल्ट हे टेबल सॉल्टपेक्षा दुप्पट वापरावं लागतं. टेबल सॉल्ट हे साधारणपणे वापरलं जाणारं मीठ. त्याचे कण चौकोनी असतात. हे मीठ जमिनीखालचं खनिज वापरून बनवलेलं असतं. ते टेबलवर पोहोचेपर्यंत त्यात ऍण्टि केकिंग एजंट मिसळलं जातं. ज्यामुळे ते सहज वापरता येईल असं होतं. त्यात आयोडिन घालता येतं, जे खाल्ल्यामुळे आयोडिनची कमतरता दूर करता येते. अर्थात त्यामुळे मिठाला थोडा केमिकलचा वास येतो.
समुद्री मीठ हे समुद्रातील पाण्याचं बाष्पीभवन झाल्यावर जे उरतं ते. याला सोलर सॉल्ट वा बे सॉल्ट असंही म्हणतात. गंमत म्हणजे कृत्रिमपणे केलेलं बाष्पीभवन हे सूर्याच्या सहाय्याने होणाऱया बाष्पीभवनापेक्षा स्वस्त असतं. शिवाय याला बनवायला टेबल सॉल्टपेक्षा कमी वेळ लागतो. अनेक स्वयंपाक्यांना असं वाटतं की, समुद्री मिठामुळे पदार्थाची चव जास्त चांगली होते. याशिवाय या मिठात लोह, पोटॅशियम आणि झिंक ही खनिजं असतात, पण यात अॅण्टि केकिंग एजंट नसतात.

पाकिस्तानच्या केवरा खाणीतून, ज्या आकाराने जगातल्या दुसऱया नंबरच्या खाणी आहेत, तिथे सैंधव हिमालयन पिंक सॉल्ट मिळतं. त्यात काही प्रमाणात आयर्न ऑक्साईड असतं, पण ते इतकं कमी असतं की, खाण्यासाठी सुरक्षित असतं. शिवाय कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहदेखील आढळतं. या मिठाचे बनवलेले दिवे प्रसिध्द आहेत. ते ज्या खोलीत लावतात तेथील वातावरणातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक आयॉन्सच्या परिणानांचे निक्रियीकरण होतं.

ज्या मिठात कुठलीही खनिजं वा इतर काहीही मिसळ नसते त्याला कोशर मीठ म्हणतात. या मिठाचे दाणे मोठे असतात. हे स्वयंपाकासाठी व चव वाढवण्यासाठी वापरले जाते. सेल्टिक सी सॉल्ट किंवा ग्रे सॉल्ट किंवा फ्रेंचमध्ये ‘सेल ग्री’ (Sel gris) हे फ्रान्समध्ये समुद्राला भरती आल्याने जे बाहेर पाणी जमा होतं त्यापासून करतात. या पाण्यावर मिठाचा एक पातळ थर जमा होतो. तेच जमा करून होतात मिठाचे क्रिस्टल्स. यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अल्कलाइन पीएच असतं. या मिठाला थोडा खनिजांचा वास असतो.

रॉक सॉल्ट हे खाणींमधून मिळतं. पूर्वी जिथे पाणी होतं ते संपलं आणि नंतर ती जागा हळूहळू गाळाने भरली गेली. अनेक वर्षांनंतर तिथे मिठाच्या खाणी तयार झाल्या. हवाईयन काळं (पादेलोण) आणि लाल मीठ या मिठात सक्रिय कोळसा असल्याने तो काळा दिसतो वा लाल समुद्रातून येतो म्हणून लाल दिसतो. याला ज्वालामुखी मीठ असेही म्हणतात. हे मीठ पॅसिफिक समुद्रातून येतं. या सगळ्या मिठांची सहज उपलब्धता असल्याने आज आवडीप्रमाणे वेगवेगळ्या घरात वेगवेगळं मीठ वापरताना दिसतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या