नागपूरमधील समता प्रतिष्ठान संस्थेतील गैरव्यवहारांची विशेष पथकामार्फत चौकशी, धनंजय मुंडेंची घोषणा

नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेमध्ये 3 कोटी 67 लाख रुपयांचा प्रथमदर्शनी  गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. संस्थेमध्ये अजून 14 कोटी रुपयांचा घोटाळा पुढे येईल अशी शक्यता आहे.  त्यामुळे या संस्थेमधील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत केली.

नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानमध्ये चुकीचा पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवणे, निविदा न काढता काम देणे, तसेच प्रतिष्ठानमध्ये तीन वर्षांच्या काळात 16 कोटी रुपयांचा गैरप्रकार झाल्याबाबत शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम घेण्यात आले त्याच्या खर्चामध्ये ताळमेळ लागत नाही असे स्पष्टपणे सांगितले. या संस्थेच्या व्यवहाराच्या किमान 400 फायली आहेत. प्रत्येक फाईल तपासण्यात वेळ लागेल. तरीही 3 कोटी 67 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिकदृष्टय़ा दिसून येते. तरीही कॅगचा (महालेखापाल) अहवाल आला नसल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यासंदर्भात कॅगच्या चौकशीत ज्या मुद्दय़ावर अधिकची माहिती मागितली ती देण्यात आल्याचे आणि कॅगचे समाधान झाल्याचे सांगितले. मात्र प्राथमिक चौकशीत ज्या गोष्टी पुढे आल्या आहेत त्यामध्ये कॅगचा अहवाल समोर आलेला नाही असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

माजी मंत्री अडचणीत

यामध्ये एका माजी मंत्र्याशी संबंधित काही लोकांचे संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्यावर भाजपच्या सदस्यांनी आक्षेप घेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी कॅगच्या अधिकाऱयांची नावे जाहीर करण्याची मागणी केली.

आचाऱ्याचाही समावेश

यामध्ये सोनल बडोले, उमेळ सांगोळे, प्रकाश रहांगळे आणि आचारी असलेले उमेश नंदेश्वर हे प्रकल्प अधिकारी असल्याची माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या