देगलूर नाका भागात संपत्तीच्या वादातून गोळीबार; एकाचा मृत्यू, तर चार जण जखमी

988
प्रातिनिधिक फोटो

गाडेगाव रोड देगलूर नाका परिसरात आपल्या भावकीतील अंतर्गत संपत्तीच्या वादानंतर बंदुकीच्या गोळीतून तसेच तलवारी, रॉड, क्रिकेटची बॅट याचा वापर करुन झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

महंमद अली फारुखी यांची खुदबई नगर चौरस्ता येथे मेडिकल दुकान आहे. सकाळी 11 वाजता त्याच्या भावकीतील गौस इनामदार आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी त्यांच्यावर दुकानात हल्ला केला. त्यावेळी त्यांचा मित्र सिकंदर हा उपस्थित होता. मारहाण झाल्यावर महंमद अली फारुखी आणि सिकंदर हे दोघे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेले. त्याठिकाणी काय घडले याची माहिती प्राप्त झाली नाही.

सायंकाळी चार वाजेच्या सुमारास महंमद अली फारुखी, त्यांचे बंधू महंमद जुनेद फारुखी आणि महंमद हाजी फारुखी हे मुजाहीद चौक, गाडेगाव रोड येथे असणार्‍या गौस इनामदारच्या मेडिकलवर गेले. तेथे पुन्हा भांडण झाले. त्याठिकाणी रक्ताने माखलेले क्रिकेट बॅट, काही रक्ताने माखलेली लाकडे आणि छोटेशे तिक्ष्ण हत्यार पडलेले दिसत होते. या मारहाणीमध्ये महंमद जुनेद फारुखी, महंमद अली फारुखी, गौस हफीज इनामदार आदी जखमी झाले. मुजाहीद चौरस्त्यावरील गौस इनामदारच्या मेडिकल शेजारी महंमद अली फारुखी यांचे घर आहे. याच भागात या सर्व भावकीतील लोकांची मोठी संपत्ती आहे. यातील एक गुटख्याच्या व्यवसायातील मोठे प्रस्थ आहेत.

जखमी झाल्यावर महंमद जुनेद फारुखी, महंमद अली फारुखी, गौस हाफीज इनामदार आदींना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे महंमद जुनेद फारुखी (32) याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. इतर जमखींवर उपचार सुरु आहेत. त्यात गौस हाफीज इनामदार अत्यंत गंभीर अवस्थेत आहे.

त्या मुजाहीद चौक येथे प्रत्यक्ष पाहणी केली असताना तेथील काही लोक सांगत होते की, एका महिलेने गोळी चालविली आहे. ती महिला कोण? याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर, आणि महिला पोलीस कर्मचारी शेख महेजबीन, किरण बाबर यांनी या भागातील अनेक घरे शोधली पण वृत्त लिहिपर्यंत गोळीबार करणारी महिला सापडली नव्हती. घटना घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांच्यासह असंख्य पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आदींनी या परिसरात अनेकांचा शोध घेतला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या