
सामना ऑनलाईन । बंगळुरू
कर्नाटकातील पत्रकार – सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश आणि साहित्यिक, विचारवंत एम. एम. कलबुर्गी या दोघांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल एकच होते, असा अहवाल राज्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीने दिल्याची माहिती ‘एसआयटी’च्या सूत्रांनी दिली.
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात पहिल्या चार्जशीटचा भाग म्हणून पिस्तुलाबाबतचा फॉरेन्सिक रिपोर्ट विशेष तपास पथकाला सादर करण्यात आला आहे. ‘एसआयटी’ने आपल्या आरोपपत्रात के. टी. नवीन कुमार याच्यावर लंकेश यांच्या हत्येचा आरोप ठेवला आहे.
साहित्यिक, विचारवंत कलबुर्गी यांची धारवाड येथे ३० ऑगस्ट २०१५ रोजी गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती, तर पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी गोळय़ा झाडूनच हत्या करण्यात आली.
दोन वर्षांचे अंतर असलेल्या त्या दोन्ही हत्यांचा एकमेकांशी संबंध आहे. यावर राज्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीने दिलेल्या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. त्याआधी एसआयटीनेही कलबुर्गी आणि लंकेश या दोघांच्या हत्यांमागे एकच टोळी असल्याचे मत व्यक्त केले होते.
एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या दोघांच्याही हत्येसाठी देशी बनावटीचे ७.६५ एमएमचे एकच पिस्तूल वापरण्यात आले.

























































