>> डॉ. समिरा गुजर जोशी
रामायणातील वानर नेमके कोण होते, त्यांचे राज्य कसे होते याविषयीचे कुतूहल सगळ्यांच्या मनात असते. त्याची उत्तरे आपल्याला प्रामुख्याने ‘किष्किंधा कांडा’त मिळतात. ‘रामायण’ हे आदर्श वर्तन शिकवणारे काव्य आहे. जर कोणी आपल्या आदर्श मार्गावरून दूर झाला असेल तर त्याला उपदेश करून पुन्हा मूळ मार्गावर आणण्याचे कामही कोणी ना कोणी केलेले दिसते. सुग्रीव असाच योग्य मार्ग विसरून भरकटला आहे. स्वतची कार्यसिद्धी झाल्यानंतर माणूस दिलेले वचन विसरतो, तसेच त्याचे झाले आहे. अहोरात्र तो आपल्या महालात देवराज इंद्राप्रमाणे स्वर्गसुख भोगत आहे. त्याने आपली सर्व कामे मंत्र्यांवर सोपवली आहेत. इतकेच नव्हे तर त्या मंत्र्यांची तो कधी भेटही घेत नाही.
रामाचा निरोप घेऊन लक्ष्मण जेव्हा वानरराज्याची राजधानी किष्किंधा नगरीत येतो तेव्हा सुग्रीव मद्यधुंद अवस्थेत गुंग आहे. लक्ष्मणाला ती नगरी कशी दिसली याचे वर्णन या ठिकाणी येते. तिला ‘हरिराज महापुरे’ असे म्हटले आहे. चारही बाजूंनी सैन्याने संरक्षित केलेली, पर्वतामध्ये वसलेल्या किल्ल्यासारखी तिची रचना आहे. वानर म्हणजे अप्रगत असा वनात राहणारा आदिवासी समाज होता अशी जी आपली समजूत असते तिला हे वर्णन वाचून नक्कीच धक्का बसतो.
ही नगरी जरी जंगलात वसलेली असली तरी ती रत्नखचित आहे. तिथे श्रीमंतीला काहीही कमी नाही. एवढेच नव्हे, तिथे उंच उंच इमारती, राजवाडे आहेत आणि मोठमोठी उद्याने आहेत. वानरांनी देवगंधर्वांप्रमाणे रेशमी वस्त्रs आणि अलंकार परिधान केले आहेत. सर्वत्र चंदनाचा, अगरूचा सुगंध दरवळतो आहे. त्याचबरोबर येथे मैरेय आणि मधू म्हणजे उसापासून आणि मोहाच्या फुलांपासून तयार केलेल्या दारूचाही दरवळ सर्वत्र आहे. जर वानर ही वृत्ती आहे असे मानले तर चंचलपणा, व्यसनाधीनता, इंद्रियसुखांचा अतिरेक हे त्यांचे दुर्गुण म्हटले पाहिजेत. दारूचे हे व्यसन वानर समाजात सार्वत्रिक असावे. त्यात पावसाळ्यात दळणवळण बंद असल्याने करण्याजोगे काही काम नाही. त्या वेळी सगळा समाज मद्यधुंद होऊन लोळत पडला आहे. ‘यथा राजा तथा प्रजा’ असे म्हणतात, ते उगीच नाही! (अशा ठिकाणी अपवाद आहे तो हनुमंताचा, युवराज अंगदचा आणि कर्तव्यदक्ष मंत्र्यांचा. ते सर्व भानावर आहेत.) तसे पाहता अयोध्या आणि किष्किंधा यात समृद्धी आणि विकासाच्या दृष्टीने फार फरक नाही. सांस्कृतिकदृष्ट्या मात्र फरक आहे. अयोध्येत अशी व्यसनाधीनता नाही. पावसामुळे तिथेही व्यवहार थंडावले आहेत. पण या काळात भरतासह सर्व प्रजाजन व्रतस्थ राहून अभ्यासाची उजळणी करतात. आज आपण आषाढी पौर्णिमेला ‘गुरुपौर्णिमा’ (व्यासपौर्णिमा) साजरी करतो. याच तिथीला ‘रामायण’काळात अभ्यासाची उजळणी करण्यासाठी व्रतस्थ होण्याचा प्रघात होता असा उल्लेख ‘रामायणा’त आला आहे. म्हणजे दोन्ही नगरींची भौतिक प्रगती सारखी असली तर नैतिक प्रगती मात्र भिन्न आहे असे म्हणता येईल.
आता लक्ष्मण वानरराज सुग्रीवाच्या भव्य राजवाड्याकडे निघाला आहे. त्या ठिकाणी स्त्रियांच्या नृत्य, गायनाचा स्वर निनादत आहे. अयोध्येतही लोक नृत्यगान करत आहेत, पण ते रस्त्यावर सुरू आहे. ते सार्वजनिक लोकरंजनाचे साधन आहे. इथे ती कला न राहता भोगाचे सवंग साधन ठरली आहे. आज सुग्रीवाला हे ऐश्वर्य प्राप्त झाले आहे ते केवळ रामाने केलेल्या मदतीमुळे. त्याच रामाला दिलेले वचन विसरून सुग्रीव असे नाचगाणे ऐकत बसला आहे हे पाहून लक्ष्मणाचा किती संताप झाला असेल! वाल्मिकींनी त्याच्या संतापाचे वर्णन प्रभावीपणे केले आहे. तो शब्दांनी काही बोलून दाखवत नाही, पण तो पैंजणांचा ‘छुम छुम’ नाद कानी पडल्यावर लक्ष्मणाचा राग अधिकच वाढतो आणि जिथे स्त्रिया नाहीत असा कोपरा शोधून तिथे तो आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा जोरजोरात टणत्कार करू लागतो. त्या आवाजाने तो जणू पुन्हा सुग्रीवाचे निद्रिस्त शौर्य जागवतो आहे आणि आपल्या संतापाची जाणीवही करून देतो आहे.
(निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)